मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) जवळपास दीड वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता बाहेर येताच त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच स्वागतासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे ते नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ncp Sharad Pawar faction Ajit Pawar faction Nawab Malik bail)
काल जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मलिक यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी मी पक्षासाठी नाही तर माझ्या मोठ्या भावासाठी आली असल्याचे म्हणतं भावना व्यक्त केल्या होत्या. तसंच नवाब मलिकांवर खरंच अन्याय झाला असून कुटुंबियांसह राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. कुटुंबियांनीही खूप काही सहन केलं आहे, त्यामुळे शेवटी सत्य बाहेर येतंच, असं म्हणत सुळेंनी मलिक लवकरच न्यायालयाच्या कचाट्यातून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले.
सुप्रिया सुळेंनीही दिलं उत्तर :
नवाब मलिक कोणत्या गटात जातील असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला माहित नाही, पण मी पक्ष आणि राजकारणासाठी नाहीतर मोठ्या भावाला भेटण्यासाठी आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे, त्यामुळे मी इथे त्याला भेटायला आले असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच सत्य बाहेर येईलच, सत्यमेव जयते, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं होतं.
जामिनानंतर मलिक यांच्या स्वागतासाठी कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनी काल कार्यकर्त्यांना बोलावले होते. त्यानंतर आज खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही मलिक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या. याशिवाय नवाब मलिक यांची कन्या सना मलिक आणि कप्तान मलिक यांनी अलिकडेच अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते नेमके कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मलिक कुठेही लांब जाणार नाहीत : छगन भुजबळ
मलिक आता कोणत्या गटात जातील असा प्रश्न विचारला असता मंत्री छगन भुजबळ म्हणाले, आधी नवाब मलिक यांची प्रकृती तर बरी होऊ द्या. त्यांना मूत्रपिंडाचा मोठा आजार बळावला आहे. त्यामुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. त्यांना आधी नीट तर होऊ द्या. ते बरे झाले तरच राजकारणात काम करू शकतील. त्यानंतर कुठे जायचं हे तेच ठरवतील. पण ते फार लांब कुठेही जाणार नाहीत ते इकडेच राहतील असेही भुजबळ म्हणाले.