मुंबई : बंडानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आक्रमक भाषण झाले. तब्बल 25 वर्षांपासूनची साचून राहिलेली खदखद या भाषणातून बाहेर निघाली. याच भाषणातून अजित पवार यांनी आगामी काळात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासोबतच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसविण्याचा निर्धार करण्यात आला. मात्र यावेळी बोलताना अजित पवार यांनी केलेल्या दोन दाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे टेन्शन चांगलेच वाढले असल्याचे चित्र आहे. (Ncp will contest 90 Seats and Bjp 150 seats what Eknath shined vs Devendra Fadnavis)
यावेळी बोलताना अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने आगामी निवडणूक एकत्र लढवल्यास आपल्याला विधानसभेच्या सध्याच्या 54 जागा मिळणारच आहेत. पण आगामी निवडणुकीत त्यापेक्षा जास्तीच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत 90 पेक्षा जास्त जागा आपण लढवणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2004 मध्ये 71 या आजवरच्या सर्वोच्च जागा होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे संख्याबळ कोणत्याही परिस्थितीत आपण 71 च्या पुढे नेऊ. त्यासाठी मराठवाडा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र असा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. पायाला भिंगरी लावू फिरू. याशिवाय लोकसभेच्या काही जागाही आपण लढवणार आहोत, असाही दावा अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. मी चार-पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो. पण गाडी तिथेच थांबते, पुढे काही जात नाही. मलाही असं वाटतं की, मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या असतील तर राज्याचं प्रमुखपद मिळवणे गरजेचे आहे. मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी इच्छा अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, अजित पवार यांच्या या दाव्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीचे जागा वाटपाबाबतचे गणित ठरले आहे का? असा सवाल विचारला जात आहे. याचं कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा काही दिवसांपूर्वीचा दावा. मार्च महिन्यामध्ये बावनकुळे यांनी जागावाटपासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं.आगामी निवडणुकीत भाजप 240 तर शिंदेंच्या शिवसेनेला 48 जागा दिल्या जातील असं ते म्हणाले होते.
मात्र आता राष्ट्रवादी भाजपसोबत आली असून 90 जागा लढविणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बावनकुळेंच्या दाव्याप्रमाणे भाजपने 240 पैकी 90 जागा राष्ट्रवादीला सोडल्यास भाजप 150 जागा लढविण्याची शक्यता आहे. तसंच मुख्यमंत्रीपदी अडीच वर्षांसाठी अजित पवार येऊ शकतात, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. या दोन्ही गोष्टींमुळे भाजपने सोबत घेतलेल्या शिंदेंच्या गटाला काय मिळणार हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.