मुंबईत पत्रकार परिषद घेत मंत्री नितेश राणे (Rane) यांनी विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेपासून ते मराठा आरक्षण, सणांमधील DJ आणि दिशा सालियन प्रकरणापर्यंत विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला. विश्व हिंदू परिषदेची भूमिका राजकीय नसून धार्मिक असल्याचा दावा करत राणे यांनी हिंदू सणांबाबतच नियम आणि आव्हानं का दिली जातात, असा सवाल उपस्थित केला. गणेशोत्सवाच्या वेळी हिंदूंना सूचना देणाऱ्यांनी इतर धर्मांच्या सणांबाबतही समान भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.
DJच्या मुद्द्यावरही राणे यांनी समान नियमांची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक पद्धतीने सण साजरे करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे, मात्र DJमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर ईदच्या मिरवणुकीतही त्यावर समान नियम लागू झाले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले. रस्त्यावरच्या नमाजापासून विविध धार्मिक मिरवणुकांपर्यंत कायदा सर्वांसाठी समान असावा, अशी भूमिका मांडत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील समानतेच्या विचाराचा दाखला दिला.
पुण्यात DJवरून वाद, नागपुरात थेट बंदी! नांगरे पाटलांचा कडक आदेश; नियम मोडल्यास वाहनेही होणार सील
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे राणे यांनी सांगितले. हिंदू समाजातील सर्व जातींचा समान विचार करण्याची जबाबदारी महायुती सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी गुजराती समाजावरून सुरू असलेल्या राजकीय टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. सकाळी गुजराती समाजावर बोलणारे नेते आणि त्याच नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्ती संध्याकाळी गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असल्याचा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर बोलताना बडोद्याच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत हीच पंतप्रधानांची लोकप्रियता असल्याचेही राणे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या GDP संबंधी वक्तव्यावर राणे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. GDP आणि ठाकरे यांचा काय संबंध, असा सवाल करत त्यांनी यावर भाष्य केले. दिशा सालियन प्रकरणावरूनही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. आदित्य ठाकरे या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगत असतील, तर त्यांच्या वकिलांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र का दाखल केले, असा सवाल राणे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणात लपवालपवी का झाली, याचे उत्तरही मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
