Download App

राम मंदिराची निर्मिती झाली म्हणून कुणी हिंदूंचा नेता… मोहन भागवत यांचं मोठं विधान

भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना

  • Written By: Last Updated:

RSS Chief Mohan Bhagwat : धर्म हा प्राचीन असून, धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. ती योग्यच आहे. मात्र, मंदिराची निर्मिती झाली आहे म्हणून कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपली भूमिका मांडली. (RSS ) तसंच ते लोभ, लालूच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे, असंही म्हणाले. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

भौतिक सुखातून नव्हे, तर नैतिक तत्त्वातून भारत विश्वगुरू होईल. विश्वगुरू होण्याची भारताची क्षमता आहे. भौतिक प्रगती होत असताना नैतिक प्रगती झाल्यास ‘विश्वगुरू भारत’ ही केवळ घोषणा किंवा स्वप्न राहणार नाही, तर येत्या २० वर्षांत भारत विश्वगुरूपदाला पोहोचलेला दिसेल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला

भारतीय प्राचीन, सनातन हिंदू राष्ट्राची उत्पत्ती धर्मतत्त्वातून, सत्यातून झाली आहे. सृष्टीचे विज्ञान जाणून जगाच्या कल्याणाची इच्छा ठेवून राष्ट्रनिर्मिती झाली आहे. हा इतिहास कोणी तरी फायद्यासाठी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आजही दडविला जात आहे. या देशाची परोपकारी वृत्ती असून, श्रीलंका, मालदीव, लिबिया यातील उदाहरणांवरून ते दिसून आले आहे. देशाची परंपरा शाश्वत आहे असंही ते म्हणाले.

आमचेच खरे असे म्हणणारे आम्ही नाही. तसंच, आम्ही सर्वांविषयी श्रद्धा ठेवणारे आहोत. मात्र, आमच्या देवतांवर आक्रमण करून, अरेरावी करून कोणी मतांतर करणार असेल, तर ते चालणार नाही. बाहेरून आलेले काही लोक वर्चस्ववादासाठी आग्रही आहेत. मात्र, स्वतंत्र देशात राहायचे असताना वर्चस्ववादाची भाषा कशासाठी हवी, अशी विचारणा भागवत यांनी केली.

देशाने निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार आचरण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्यघटनेला धरून प्रामाणिकपणे वाटचाल करावी लागेल. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचे श्रद्धापूर्वक आचारण केले पाहिजे. या कर्तव्यांची समाजात आणि कुटुंबातही चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. भागवत यांनी व्यक्त केली.

follow us