Ahmadnagar Crime News : अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. नगरच्या रस्त्यावर रक्तरंजित खेळ सुरु असल्याने आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या खुनाच्या आरोपात भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. यावरून काँग्रेसने भाजप आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. राणेंनी विधानसभेत नगर शहरात जातीय दंगल भडकेल अशा पद्धतीने गरळ ओकली होती. आता त्यांच्याच नगरसेवकाने हत्याकांड केले. हिंमत असेल तर राणेंनी त्यांच्या गृहमंत्र्यांना अधिवेशनात जाब विचारून दाखवावा, असे जाहीर आव्हान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आमदार नितेश राणेंना दिले आहे.
नगर शहरातील एकविरा चौकात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात राष्ट्रवादीच्या अंकुश चत्तरचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर काँग्रेसने रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. खुनाचा मूळ सूत्रधार भाजपाचा नगरसेवक आहे. राज्यात भाजप प्रणित सरकार आहे. गृहमंत्री भाजपचे आहेत. तेच नगरचे प्रभारी आहेत. सावेडीसह शहरातील हिंदुत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते घेत असल्याचा आरोप काळेंनी केला.
दिल्लीत आज एनडीएची बैठक; राज्यातून एकनाथ शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार
काळे म्हणाले , शहराला राजकीय गुन्हेगारीचा कलंक लागला आहे. शिवसैनिकांच्या केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर चत्तर, ओंकार भागानगरे या हिंदुत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या तरुणांचे बळी घेतले गेले. या दोन्ही घटनांमध्ये या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे. पोलीस प्रशासन आणि तथाकथित राज्यातील हिंदुत्ववादी सरकार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्यांना आळा घायलाचा असेल तर त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आधी एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ तडीपार करावे, अशी जाहीर मागणी काळेंनी एसपी राकेश ओलांकडे केली आहे. तसेच सामान्य नगरकरांच्या संयमाची परीक्षा न पाहता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व शहर भाजपने त्या नगरसेवकाची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, त्याचे नगरसेवक पद रद्द करावे अशी जाहीर मागणी कॉँग्रेसने केली आहे.