Ahmednagar Crime : अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिन्यात खून, हत्याकांडाच्या घटना या तीव्रतेने घडू लागल्या आहेत. नुकत्याच घडलेल्या ओंकार भागानगरे खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या घटना ताज्या असताना आता कोपरगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कोपरगावातील पेट्रोल पंप मॅनेजरची धारदार शस्राने वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. भोजराज बाबुराव घणघाव ( वय ४० वर्षे रा. दहेगाव बोलका, कोपरगाव) असे मयत पेट्रोल पंप मॅनेजरचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( Ahmednagar District Again socked Petrol Pump Manager Killed )
शहरासह जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी वाढू लागली आहे. दरदिवशी जिल्ह्यात काहींना काही गुहेगारीच्या घटना समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नगर शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेरात एकाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांचा खून करण्यात आला होता. हे सगळे सुरु असताना शेवगाव शहरात दुहेरी हत्याकांड झाले होते. नगर शहरासह सध्या जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजावरा उडालेला दिसून येत आहे.
हे सगळं सुरु असताना कोपरगावात मोठे हत्याकांड समोर आले आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास गुरूराज पेट्रोल पंपावर दुचाकीवरून तिघे तरुण आले. यावेळी किरकोळ कारणावरुन पेट्रोल पंपाचे कर्मचारी आणि या तरुणांमध्ये वाद झाला. या तरुणांनी टोकाची भमिका घेत धार-दार शस्राने पेट्रोल पंपाचे मॅनेजर भोजराज घनघाव याच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाण्यात आले मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. हल्याचा प्रतिकार करताना पेट्रोल पंपावरील कर्मचारी संतोष मोरे हा देखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. हत्येचा संपूर्ण थरार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.