ऊसाच्या दराबाबत आठवडाभरात कारखानदारांनी अंतिम निर्णय करावा…मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सूचना!
ऊसाच्या दराबाबत कारखानदारांनी आठवडाभरात अंतिम निर्णय घ्यावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखानदारांना केल्या आहेत.
Minister Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराची कोंडी फुटावी आणि सर्वच कारखानदारांनी आठवडाभरातच अंतिम निर्णय करावा, अशी सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrushna Vikhe Patil) यांनी राज्यातील सर्वच कारखान्यांना केली आहे. ते अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि साखर कारखान्यांचे पदाधिकारी यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊसदाराची कोंडी फुटावी, या संदर्भात सर्वच कारखानदारांनी निर्णय करावा. काही जिल्ह्यात अजूनही कारखाने सुरु झालेले नाहीत. काही भागांतील शेतकरी कारखाने मिळवून निर्णय करत आहेत. सर्वच जिल्ह्यांचा एकच निर्णय होऊ शकत नाही. सर्वच जिल्हे एकच निर्णय करतील अशी कारखानदारांची मानसिकता नाही, तरीही लवकरात लवकर यासंदर्भात निर्णय करावा. दर जाहीर करताना यंदा गाळपच मूळ कमी होणार आहे. पुढील वर्षी गाळपच नाही त्याचे नुकसान भरपूर होणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलंय.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी वजनकाटा तपासण्याची होती, ही मागणी तत्काळ मान्य केलीयं. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जातील अन् वजनकाटाची तपासणी करतील. या आठवड्यात सर्वच कारखानदारांनी अंतिम निर्णय करावा, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींनी ऊस दराच्या बाबतीत एक पाऊल मागे येत 4500 रुपयांच्या वरून 4200 रुपयांवर तोडगा काढावा अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे कुटुंब प्रमुख म्हणून बघावं मात्र तुमचं तुम्ही बघा असं म्हणत ते बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोपही राजू शेट्टींनी यावेळी केलायं.
दरम्यान, अद्याप राज्यातील साखर कारखान्यांचा ऊसाच्या दराबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसून सर्वच जिल्ह्यातील कारखान्यांचा निर्णय एकच होऊ शकत नाही. त्यामुळे कारखानदारांनी बैठका घेऊन लवकरात लवकर ऊसाचे दर निश्चित करण्याबाबतच्या सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.