Download App

Ahmednagar loksabha Election : पारनेरसह नगर शहरानं विखे-लंकेंची धाकधूक वाढवली…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 69.79 मतदान झालं. राहुरीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेसाठी जोर लावला.

Image Credit: Letsupp

Ahmednagar loksabha Election : राज्यात चौथ्या टप्यातील निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून(Mahayuti) सुजय विखे (Sujay Vikhe)यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून(MVA) निलेश लंके (Nilesh Lanke)असा थेट सामना या निवडणुकीत रंगला. मात्र यंदाच्या निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. लंके यांचा बालेकिल्ला असलेला पारनेर तर विखे यांनी अंदाज बांधलेल्या नगर शहरातून मोठे मतदान होईल, असा अंदाज लावला जात असतानाच या दोन्ही ठिकाणाहून धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. पारनेरमध्ये 64 टक्क्यांच्या जवळपास मतदान झालं तर नगर शहराला 60 टक्क्यांचा आकडा देखील गाठता आला नाही. तर दुसरीकडं जिल्ह्यातील बलाढ्य नेते असलेल्या राहुरी आणि कर्जत-जामखेडमध्ये मतदानाची टक्केवारी ही चांगली होती, मात्र उमेदवारांना त्यांच्याच होम ग्राउंडवर घटलेली मतदानाची टक्केवारी पाहता जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं आहे? किंवा धक्कादायक निकाल येणार का? याची उत्सुकता नगरकरांना लागलीय. दरम्यान कोणत्या तालुक्यात किती टक्के मतदान झालं? आणि ज्या ठिकाणी मतदानाचा टक्का घसरला, त्याचा फटका कोणत्या उमेदवारांना बसणार? तसंच वाढलेलं मतदान कोणाला तारणार? अन् कोणाला पाडणार? हेच आपण जाणून घेऊ..

मैं फकीर हूं! मोदींकडे घर, जमीन-जुमला अन् गाडी काहीच नाही पण..,

लंकेंच्या बालेकिल्ल्यात परिस्थिती काय?
पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांचा पारनेर हा बालेकिल्ला समजला जातो. लंके यांनी अनेक सभा या ठिकाणी घेत मोठी मतपेरणी केली होती. तर दुसरीकडं महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी देखील पारनेरवर लक्ष ठेवत मोठ्या सभा या ठिकाणी घेतल्या. लंकेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर शह देण्यासाठी विखेंनी विकासाचे मुद्दे तसेच भयमुक्त पारनेरचा नारा देत प्रचार केला. दोघाच्या जोरदार सभानंतर या ठिकाणी मतदान मोठ्या प्रमाणावर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र मिळालेल्या आकडेवारीनुसार ३ लाख ४० हजार ९७५ मतदारांपैकी २ लाख १८ हजार १३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६४ टक्क्यांच्या जवळपास मतदान हे पारनेरातून झालंय. पारनेरमध्ये पैशांचा पाऊस, आरोप प्रत्यारोप यामुळं देखील मतदार नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं आकडेवारीची गणितं काहीशी फिस्कटल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या. असं असलं तरी लंके यांना बालेकिल्ल्यातून मोठं लीड मिळणार का? की घटलेली आकडेवारी विखेंना पोषक ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणारंय.

पंतप्रधान मोदी अन् अनुराग ठाकुर यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

नगरकरांची पाठ उमेदवारांना भोवणार?
लंके व विखे या दोन्ही उमेदवारांनी नगर शहरात जंगी सभा घेतल्या, विखेंसाठी मुख्यमंत्र्यांसह खुद्द मोदी रिंगणात उतरले होते. तर लंकेसाठी शरद पवार, आदित्य ठाकरे हे मैदानात होते. नगर शहरातून देखील मोठ्या मतदानाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. माविआसाठी शहरातील शिवसैनिक तसेच शरद पवारांच्या समर्थकांनी जोर लावला तर दुसरीकडं सत्ताधारी गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर नगर शहराची धुरा होती. सकाळच्या सत्रात कमी मतदान झालं मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी वाढली. मात्र एवढं सगळं असताना देखील नगर शहरातील मतदानाची टक्केवारी घसरली. 3 लाखांहून अधिक मतदार असलेल्या नगर शहरात १ लाख ७४ हजार म्हणजेच 57 टक्के मतदान झालं. एकंदरीतच जंगी सभा, बलाढ्य नेते शहरात आले मात्र मतदारांना ते मतदानकेंद्रापर्यन्त खेचण्यात अपयशी ठरल्याचं आकडेवारीतून दिसतंय.

राहुरीत सर्वाधिक मतदान, कोणाला फायदा होणार?
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 69.79 मतदान झालं. राहुरीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेसाठी जोर लावला. याठिकाणी खुद्द शरद पवार यांनी देखील सभा घेतली. तर विखेंसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे मैदानात उतरले. प्रवरेच्या पट्ट्यातील अनेक गावं ही राहुरी मतदारसंघात येत असल्यानं वाढलेलं मताधिक्य हे विखेंना लीड देणार, अशी परिस्थिती दिसतेय. यातच राहुरीमधील आकडेवारी पहिली असता 3 लाख 11 हजार 745 मतदारांपैकी 2 लाख 17 हजार 565 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा मतदारांची संख्या देखील वाढली. यातच राहुरीमध्ये गेल्या काळात झालेले धार्मिक मुद्दे पाहता अल्पसंख्यांकांचं मतदान देखील याठिकाणी वाढलं. असं असलं तरी विखेंच्या बालेकिल्ल्याचा पट्टा असलेल्या राहुरीतून विखेंना चांगला लीड मिळेल असं वातावरण आहे.

कर्जत-जामखेडचे वारे कोणाच्या बाजूने?
राहुरीपाठोपाठ कर्जत -जामखेडमध्ये मतदानाचा टक्का चांगला राहिला. विखेंशी असलेला कलह बाजूला सारत विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी विखेंसाठी मोठी मतपेरणी मतदारसंघात केली, तर प्रतिस्पर्धी लंकेंच्या बाजूनं असलेले युवा आमदार रोहित पवार हे देखील मैदानात उतरले होते. निवडणुकीच्या धामधूमीमध्ये नगर जिल्ह्याचं नामकरण देखील याच ठिकाणाहून झालं. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात आलं. याचा फायदा हा विखेंना होणार अशी चर्चा देखील मतदारसंघात होती. तालुक्यात 3 लाख 36 हजार 903 मतदारांपैकी 2 लाख 21 हजार 727 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची टक्केवारी पाहिली असता ती 65.81 टक्के एवढी आहे. दोन्ही मतदार संघात मतदान चांगलं झालं मात्र जनता कोणाला साथ देणार? हे मात्र येणारा काळच ठरवेल…

सात लाखांहून अधिक मतदार मतदानापासून वंचित
पुढील महिन्यात चार तारखेला मतमोजणी झाल्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाला खासदार मिळणारंय. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लाख 81 हजार 866 मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 12 लाख 63 हजार 781 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर एकूण 7 लाख 18 हजार 85 मतदार हे मतदानापासून वंचित राहिले. याची टक्केवारी पहिली असता 63.77 टक्के मतदान झालं. दरम्यान मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावली. मात्र, फारसा जोर दिसला नाही. उन्हाची तीव्रता कमी होत गेल्यानं दुपारनंतर मतदारांची संख्या पुन्हा वाढली. आणि मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या…

follow us

वेब स्टोरीज