Nilesh Lanke : नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या दुरूस्तीसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी (Nilesh Lanke) केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची मंगळवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. या रस्त्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात गडकरी यांनी पुढील आठवडयात रस्ते वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलविण्यात आल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
नगर-मनमाड तसेच नगर-पाथर्डी या दोन्ही रस्त्यांची दुरावस्था झाल्याने त्यांची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी खा. लंके यांनी मागील वर्षी उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नगर येथे येत आंदोलन मागे घेण्यासाठी यशस्वी मध्यस्थी केली होती.
त्यावेळी पवार यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी संपर्क करून लंके यांच्या या आंदोलनात तोडगा काढला होता. गडकरी यांनी अजित पवार यांच्यासह लंके यांच्याशी चर्चा करून विशेषतः नगर-पाथर्डी रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली होती. काम लगेच सुरू होऊन पुर्णही झाले होते.
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : सुजय विखे-निलेश लंके राजकीय वैर खरंच संपलंय का?
नगर-मनमाड रस्त्याचेही काम सुरू झाले मात्र ते पुन्हा थंडावल्याने नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुरी मतदारसंघात नगर-मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. खा. लंके यांच्याकडूनही या रस्त्याच्या दुरावस्थेस माजी खासदार डॉ. सुजय विखे हेच जबाबदार असून त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही त्यांना करता आला नसल्याची टीका केली होती.
दरम्यान, खा. नीलेश लंके हे संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी गेले होते त्यावेळीही नितीन गडकरी यांची संसदेच्या आवारात त्यांची भेट झाली होती. त्याच वेळी लंके यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कामाविषयी गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी गडकरी यांनी कार्यालयात येऊन त्यासंदर्भात निवेदन देण्याबाबत सुचित केले होते. गडकरी यांच्या सूचनेप्रमाणे खा. लंके यांनी नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात त्यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
Nilesh Lanke : लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ
या रस्त्यावर शेकडो प्रवाशांचे बळी गेले असल्याचे लंके यांनी मंत्री गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. याच मार्गाने शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविक जात असतात. या भाविकांनाही खराब रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही लंके यांनी गडकरी यांना सांगितले. त्यावर गडकरी यांनी पुढील आठवडयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. या बैठकीस खा. लंके हे देखील उपस्थित राहणार आहेत.