Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यांवर (Maharashtra Elections) धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवार गटात (Sharad Pawar) प्रवेश केला. त्यानंतर आता अशीच एक भाजपाला धक्का देणारी बातमी नगर जिल्ह्यातून आली आहे. भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करत असलेले डॉ. राजेंद्र पिपाडा चक्क शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते. शरद पवारांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. येथील गर्दी पाहता पिपाडा मात्र शरद पवारांना न भेटताच माघारी परतल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या राजकीय घडामोडीने नगर जिल्ह्यातील भाजपात खळबळ उडाली आहे. सन 2009 मधील विधानसभा निवडणुकीत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आताचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखेंना जोरदार टक्कर दिली होती. या चुरशीच्या लढतीत पिपाडा यांचा फक्त 13 हजार मतांनी पराभव झाला होता.
देवेंद्र फडणवीसांनी कोणता प्रस्ताव दिला? तुतारी हाती घेताच पाटील म्हणाले, आता..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत इनकमिंग वाढलं आहे. त्यातही शरद पवार गटाकडे इच्छुकांचा कल जास्त आहे. त्यामुळे शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याकडे उमेदवारी मागणी करणाऱ्या इच्छुकांची संख्या सातत्याने वाढत आहे. नगर जिल्ह्यातील कार्यकर्तेही शरद पवारांची भेट घेत आहेत. यात आता भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांची भर पडली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधी डॉ. पिपाडा शरद पवारांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र येथे गर्दी पाहून शरद पवारांची भेट न घेताच पिपाडा माघारी परतले.
या घडामोडीची नगर जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरंतर राजेंद्र पिपाडा राधाकृष्ण पाटील यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. पिपाडा यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत भाजपकडे उमेवारीची मागणी केली होती. अद्याप भाजपने शिर्डीच्या जागेचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे येथून कुणाला तिकीट मिळणार हा प्रश्न अजून तरी गुलदस्त्यात आहे.
राजेंद्र पिपाडा यांनी काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. विखे पाटील महादेवाच्या पिंडीवर बसलेले विंचू आहेत. या विंचवाला मारायचं असेल तर महादेवाला लागतं अशी अवस्था भाजपाच्या नेत्यांची झाली आहे अशी टीका राजेंद्र पिपाडा यांनी केली होती. विखे पाटील यांच्या सांगण्यावरूच माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता असा गंभीर आरोप पिपाडा यांनी केला होता. विखे पाटील भाजपाच्याच नेत्यांना त्रास देत असून ते पक्षात आल्यानंतर पक्षाची अधोगती सुरू झाली अशी टीका पिपाडा यांनी केली होती.
एकतर तुमचा कार्यक्रम नाहीतर माझा कार्यक्रम; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं का म्हणाले?