Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध (Ashok Kharat) लैंगिक अत्याचाराचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. तर इतर चार गुन्हे दाखल आहेत. त्यातील नऊ गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
अशोक खरातविरुद्ध नाशिक व नगर जिल्ह्यात 12 गुन्हे दाखल आहेत. त्यातील नऊ गुन्ह्यांचा तपास एआयटी करत आहे. तर दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलिस करत आहे. तर एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलिस करत असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. आठ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहेत. तर फसवणुकीचा एक गुन्हा आहे. यात तीस साक्षीदार तपासले आहेत. त्यातून आरोपी पीडितांचा श्रद्धेपोटी गैरफायदा घेत होता. त्यांना भिती दाखवत होता. खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा विधीच्या माध्यमातून पैसा उकळत होते. दैवी शक्ती असल्याचे भासवत होता. कुटुंबातील सदस्याची मृत्यूची भिती दाखवत होता. बदनामी करून लैंगिक शोषण करत होता. ईशानेश्वर मंदिरात अंधारात हातचलाखीने दैवी शक्ती असल्याचे दाखवत होता. समाजात अंधश्रद्धा पसरवत होता, असे तपासात समोर आले असल्याचे सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
लोक काय म्हणतील या भितीने अन्याय सहन केला
महिला अत्याचाराच्या संदर्भात आठ गुन्ह्यात पीडिता आणि त्यांचे कुटुंब धाडसाने समोरे आले आहेत. त्यामुळे आरोपीवर कारवाई करता आली. महिलांनी लोक काय म्हणतील या भितीने अन्याय सहन केला आहे. आता धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळेच गुन्हा दाखल झाले आहेत.
साडेचार हजार लिंक डिलिट
अशोक खरात आणि पीडितांचे लिंक व्हायरल करण्यात आल्या होत्या. त्यातील एसआयटीची सायबर टीम आणि महाराष्ट्र सायबर क्राइमने 4650 लिंक डिलिट केल्या आहेत. तर सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे 451 अकाउंट कायमचे हटविण्यात आले आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणाऱ्यांना दोन गुन्हे दाखल आहेत. सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्ह्यात मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलंय आहे का ?
फिर्यादी आणि साक्षीदार सांगतात, त्यानुसार तपास होता. पुराव्यानुसार तपास केला होता. पुराव्याचे आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का ? त्यानुसार चौकशी आणि इतर कायदेशीर कारवाई केली जाईल. गुन्ह्यात मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलंय आहे का ? इको सिस्टिम निर्माण करण्यास मदत केली आहे का ? या अँगलने तपास करत आहे. याबाबत पुराव्यानुसार निश्चित झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एसआयटीच्या प्रमुख सातपुते यांनी सांगितले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेले नाहीत. तर सीडीआर लिकबाबत चौकशी सुरू आहे. यात जे निष्पण होईल ते समोर येईल.
