Sunny Jadhav News : अहिल्यानगर शहरातील कल्याण रोड परिसरात रविवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. रील स्टार सनी जाधव (Sunny Jadhav) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी पिस्तुल राेखत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनी जाधव हे कल्याण रोड परिसरात असताना अचानक काही संशयितांनी त्यांच्यावर पिस्तुल राेखत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी काेतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला असून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
65 बनावट खाती, 52 कोटींचा व्यवहार अन् परदेशात पलायन; भोंदू खरातच्या डोक्यात नक्की काय होतं?
आरोपी थेट कट्टा घेऊन आल्याने परिसरात काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्याचवेळी परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने धाव घेत आरोपींना जेरबंद केले. त्यामुळे संभाव्य रक्तपात टळल्याची चर्चा परिसरात सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी रवी साळुंखे आणि निखिल चव्हाण (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपींकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेनंतर कल्याण रोड परिसरात मोठी गर्दी जमली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
अंबानींचे सर्वात मोठे नुकसान ! देशातील टॉपच्या दहा कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घटले !
दरम्यान, या गुन्ह्या नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, सोशल मीडिया प्रसिद्धी किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
