अंबानींचे सर्वात मोठे नुकसान ! देशातील टॉपच्या दहा कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटींनी घटले !
Share Market Crash-बजाज फायनान्सच्या मार्केट कॅपमध्ये 27 हजार 829 कोटी रुपयांची, एल आणि टीच्या बाजारमुल्यात 9 हजार 78 कोटी घट.
Share Market Crash: जागतिक तणाव व इंधनाच्या वाढत्या दराचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) होत आहे. मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घट झाली आहे. सेन्सेक्स (BSE SENSEX) आणि निफ्टी 50 मध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे दहा कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये तब्बल 3.12 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक फटका मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्सला बसला आहे.
रिलायन्सच्या बाजारमूल्यात तब्बल 1 लाख 34 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. तर टाटा ग्रुपची आयटी कंपनी टीसीएसचेही मोठी नुकसान झाले आहे. टीसीएसचे बाजारमूल्य 47 हजार कोटी रुपयांनी घटले आहे. शेअर बाजारातील या घसरणीचा परिणाम देशातील मोठ्या बँका आणि कंपन्यांवरही झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक, एचडीएफसीला बँकेला मोठा फटका बसला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मार्केट कॅपमध्ये 52 हजार 245 कोटी रुपयांची घट झालीय. एचडीएफसी बँकेच्या बाजारमूल्यात (मार्केट कॅपमध्ये) 20 हजार 630 कोटी रुपयांची घट झालीय. आयसीआयसीआय बँकेच्या मुल्यात 14,290 कोटी रुपयांची घट झाली आहे.
बजाज फायनान्सच्या मार्केट कॅपमध्ये 27 हजार 829 कोटी रुपयांची, तर लॉर्सन आणि ट्युब्रो म्हणजेच एल आणि टीच्या बाजारमुल्यात 9 हजार 78 कोटी घट झाली आहे. तर हिंदुस्तान यूनिलीवरचे बाजारमूल्य 3,970 कोटी रुपये घटले आहे. एलआयसीचे बाजारमूल्य 2,182 कोटी रुपयांनी घटले आहे.
घसरणीमागील कारणे कोणती ?
पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारही कोसळत आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑइल म्हणजेच इंधनाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. वाढत्या किंमती आणि कमी पुरवठ्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत आहे. तर विदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली मोठी विक्री यामुळे बाजारावर दबाव वाढला आहे. या सर्व कारणामुळे बाजारात घसरण होत आहे.