Jalgaon Railway Accident : जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला (Pushpak Express) आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या (Bangalore Express) खाली चिरडल्यामुळे या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला. या हृदयद्रावक घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) माध्यमांना दिली.
उदल कुमार नावाचे व्यक्ती लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेसने निघाले होते. रोजगाराच्या शोधात ते मुंबईला निघाले होते. त्यांच्यासोबत मेहुणा विजय देखील होता. रेल्वेच्या जनरल डब्यातून दोघे प्रवास करत होते. त्याचवेळी रेल्वेच्या रसोईतील आग लागली आग लागली अशी ओरड सुरू झाली. प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. काय होतंय कुणाच्याच लक्षात येईना. आजूबाजूच्या डब्यातही असाच गोंधळ सुरू होता.
जळगाव रेल्वे दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा; रामदास आठवलेंची मागणी
या गोंधळातच काही प्रवाशांनी जीवाच्या भीतीने रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी उड्या मारण्यास सुरुवात केली. यावेळी गाडीचा वेग खूप जास्त होता. याच दरम्यान एका प्रवाशाने रेल्वेतील साखळी जोरात ओढली. त्यामुळे रेल्वे थांबली. प्रवासी गाडीतून खाली उतरू लागले. पळत शेजारच्या रेल्वे रुळावरून जात असताना समोरून बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने येत होती. या रेल्वेने प्रवाशांना जोरात धडक दिली आणि पुढे जाऊन थांबली. या अपघातात मयत झालेल्या प्रवाशांच्या शरीरीची इतकी दुर्दशा झाली की मी सांगूही शकत नाही. या अपघातात उदल कुमार आणि विजय कुमार दोघांनाही धडक बसली ते जखमी झाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. फडणवीस म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळील एका दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल, अशी घोषणाही फडणवीसांनी केली.