Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Jalgaon DCC Bank Election) निवडणुकीत महायुतीचा दबदबा निर्माण झाला आहे. तब्बल बारा जागा बिनविरोध झाल्या असून, या सर्व जागा महायुतीतील आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या (Gulabrao Patil) नेतृत्वाखाली शिवसेनेचे (Shivsena) सर्वाधिक सहा जागा बिनविरोध करत आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या (BJP) चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 जागांवर उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
मंगळवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. दिवसअखेर अनेक मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलली आणि महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
खरातच्या माध्यमातून तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या; रुपाली चाकणकरांबाबत रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
शिवसेनेची सर्वाधिक सहा जागांवर बाजी
शिवसेने सर्वाधिक जागा बिनविरोध मिळवत भाजपलाही मागे टाकले आहे. जळगाव सोसायटी मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील भाजपच्या जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यापूर्वी कुलभूषण पाटील यांनीही माघार घेतली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. गुलाबराव पाटलांसह आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित, मृणाल अमोल पाटील, नलिनी चिमणराव पाटील, सोमसिंग खुमानसिंह पाटील हे सेनेचे सहा जण बिनविरोध झाले.
पाचोऱ्यात भाजपची माघार
पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातही महायुतीमध्ये जागेवरून मोठा पेच निर्माण झाला होता. या मतदारसंघातून शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, या जागेवर भाजपनेही दावा केला होता. अखेर भाजपचे सतीश शिंदे यांनी माघार घेतल्याने सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
ती बैठक अन् शिंदेंना एक मिनिट उशीरा आलेला मेसेज निर्णायक ठरणार? शिंदेंच्या वकीलांचा जोरदार युक्तिवाद
भाजपच्या चार जागा बिनविरोध
भाजपनेही चार जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेत महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. याशिवाय चोपडा मतदारसंघातून रोहित निकम, भुसावळमधून रजनी सावकारे आणि मधुकर राणे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा बिनविरोध
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही दोन जागांवर बिनविरोध विजय मिळवला. अमळनेर मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील यांची माघारीच्या एक दिवस आधीच बिनविरोध निवड झाली होती. तर धरणगाव मतदारसंघातून सोनल संजय पवार यांची अखेरच्या दिवशी बिनविरोध निवड निश्चित झाली.
