SDRF Boat Accident : उजनी धरणात बोट उलटल्याची घटना ताजी असतानाच अशीच घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफची बोट उलटली. या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. काल प्रवरा नदी पात्रात दोन तरुण बुडाले होते. यातील एका जणाचा मृतदेह मिळाला होता. तर एका जणाचा शोध सुरू होता. या तरुणाच्या शोधासाठी एसडीआरएफचे पथक आले होते. शोधकार्य सुरू असतानाच या पथकाची बोट उलटली. या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
मोठी बातमी! वादळी वाऱ्यामुळे उजनी धरणात बोट उलटली, 7 जण बुडल्याची माहिती
प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक नागरिक असे एकूण सहा जण बोटीतून नदीपात्रात गेले होते. शोधमोहिम सुरू असतानाच अचानक बोट उलटली. या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बाकीच्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या निळवंडे आणि भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे मे महिन्यात उन्हाळ्याच्या दिवसात प्रवरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. या नदीपात्रात बुधवारी पोहण्यासाठी दोन तरुण गेले होते. परंतु, ते पाण्यात बुडाले. यानंतर परिसरातील काही जणांनी पाण्यात उतरून त्यांचा शोध घेतला. असता यातील एका जणाचा मृतदेह हाती लागला. यानंतर मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. दुसऱ्या तरुणाचा शोध लागला नव्हता.
या तरुणाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे पथक धुळ्यावरून आले होते. त्यांंनी तरुणाच्या शोधासाठी मोहिम सुरू केली. परंतु, त्यांच्याच बाबतीत दुर्घटना घडली. जोरदार प्रवाह असलेल्या पाण्यात बोट उलटली. त्यामुळे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी येथील परिस्थितीची माहिती प्रशासनाकडून घेतली. या घटनेतील अन्य तिघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली.
उन्हाळ्यात पाऊस धारा! राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचे; ‘या’ भागात अलर्ट जारी