Download App

भाजपला नगरी धक्का! पिचड पितापुत्रांनी घेतली शरद पवारांची भेट; तुतारी हाती घेणार?

बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मधुकर पिचड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा (Maharashtra Elections) लवकरच होणार आहे. त्याआधी फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. तसेच नेतेमंडळींकडून सेफ पक्षाचा शोध घेतला जात आहे. तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने दुसऱ्या पक्षांकडे चाचपणी सुरू झाली आहे. यात दिग्गज नेतेही मागे नाहीत. नगर जिल्ह्यात (Ahmednagar News) या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीत त्यातही शरद पवार गटात (Sharad Pawar) जाण्यात जास्त इच्छुक दिसत आहेत. यातच आता भाजपला धक्का देणारी नगर जिल्ह्यातून बातमी आली आहे.

अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमधील पूर्वाश्रमीचे दिग्गज नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड सध्या भाजपात आहेत. मात्र पितापुत्राची ही जोडी लवकरच तुतारी हाती घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे. यामागे कारणही तसंच आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून पिचड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे अन् शरद पवारांकडून ते लिहून घ्या; देवेंद्र फडणवीसांचा थेट मनोज जरांगे पाटलांवर घाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही पितापुत्रांनी जवळपास अर्धा तास शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. या भेटीत तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अजून तरी मिळालेली नाही. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत यावेळी चर्चा झाली असावी असे समजते.

बदलत्या राजकारणाने पिचडांची कोंडी

आगामी विधासभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. जागावाटपात अकोलेची जागा अजित पवार गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपल्याला भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाही असा अंदाज माजी आमदार वैभव पिचड यांना आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचेच डॉ. किरण लहामटे आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचं पारडं जड आहे. या बदलत्या राजकारणामुळे पिचड पितापुत्र पुन्हा घरवापसी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी याआधीही शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीत प्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. याआधी सन 2019 मध्ये मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. मात्र यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचडांना पराभव स्वीकारावा लागला होता. भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांना लॉटरी लागली. या निवडणुकीत त्यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला होता.

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर प्रश्नावर चर्चा होणार

follow us