Maharashtra Elections : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून येत्या काही दिवसांमध्ये मतदान प्रक्रिया देखील पार पडणार आहे. दरम्यान राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचं दिसतंय. यातच काही अपक्ष उमेदवार देखील रिंगणात असणार आहेत. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघामध्ये निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असे चित्र निर्माण झालं आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली आहे.
मतदारसंघात सभा अन् मेळावे घेतले आहेत. काकडे यांना मिळणार लोकांचा प्रतिसाद पाहता आता विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासह प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवार प्रताप ढाकणे यांच्यासाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान या मातब्बरांना घाम फोडणाऱ्या हर्षदा काकडे नेमक्या आहेत तरी कोण ? त्यांचा राजकीय प्रवास याबाबत आज आपण जाणून घेऊ..
हर्षदा काकडे या गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात असून तब्बल चार वेळा त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्यत्व भूषवलं आहे. 1997 ते 2002, 2007 ते 2012, 2012 ते 2017 व 2017 ते 2022 असे चार वेळा त्या निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. त्यांच्या कार्याची दाखल घेऊन राज्य सरकारने 2015-16 चा राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने त्यांचा गौरव देखील केला होता. त्याचबरोबर हर्षदा काकडे यांनी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपद भूषवलं आहे. जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून अनेक जनआंदोलने देखील त्यांनी उभारली.
Video: टक्केवारी आमदार म्हणत मोनिका राजळेंना डिवचल; हर्षदा काकडेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकलं
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी एन्ट्री केली आहे. जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काकडे कुटुंब अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. विशेष म्हणजे मतदारसंघामध्ये त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र असे असले तरी दरवेळी काही कारणांनी काकडे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघांतील राजकारण हे कायम घुले–राजळे–ढाकणे घराण्यांभोवती फिरत असते. या प्रस्थापित मातब्बरांत शेवगाव तालुक्यातील काकडे कुटुंबीय पक्षीय राजकारणा पलीकडे जाऊन कायम संघर्ष करीत आहे. स्व. आबासाहेब काकडे यांचा समाजकारणाचा वारसा ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे पुढे चालवत आहेत. यामुळे मतदारसंघामध्ये काकडे यांच्यासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघावर मराठा व वंजारी समाजाचे प्राबल्य आहे. मतदारसंघाचे राजकारण आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे व हर्षदा काकडे यांच्या भोवतीच फिरते. शेवगाव तालुक्यात घुले यांचे एकहाती तर पाथर्डी तालुक्यात राजळे व ढाकणे यांचे वर्चस्व आहे. मात्र समाजकारणात असलेलं काकडे कुटुंबियांचं योगदान पाहता यंदा प्रस्थापितांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या दोन पंचवार्षिक म्हणजेच 2014 व 2019 मध्ये काकडे कुटुंबियांना उमेदवारीपासून बाजूला ठेवण्यात आले.
श्रेयवादाची लढाई ! काकडे यांच्या कामांचे आमदार राजळेंकडून श्रेय घेतले जात असल्याचा आरोप
असे असले तरी राजकीय वारसा लाभलेल्या हर्षदा काकडे यांनी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कारभार पहिला आहे. या माध्यमातून त्यांनी संपूर्ण तालुक्यात विकासकामे केली आहेत. यामुळे आघाडी व युतीकडून उमेदवारीची अपेक्षा न ठेवता त्यांनी जनशक्ती विकास आघाडीची ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षदा काकडे यांची उमेदवारी प्रस्थापितांना घाम फोडायला लावणार हे मात्र नक्की.