Eknath Khadse : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपने सपाटून मार खाल्लेला (Lok Sabha Election) असतानाच दोन दिवसांपूर्वी दिल्लीश्वरांनी राज्यातील भाजप नेत्यांचे कान टोचले होते. राज्यात कुणाची एकाधिकारशाही चालणार नाही. मित्रपक्षांची मनं सांभाळा, जुन्या नेत्यांना सोबत घ्या अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या. यानंतर लगेचच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) थेट दिल्ली गाठली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची (Amit Shah) त्यांनी भेट घेतली. यावेळी खासदार रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. एकनाथ खडसे केव्हा भाजपवापसी करतात, पक्षाकडून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
Eknath Khadse : एकनाथ खडसेंची भाजपात येण्याची तयारी? महाजनांनी स्पष्टच सांगितलं
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. 23 जागा जिंकणारा भाजप फक्त 9 जागांवरच थांबला. केंद्रीय मंत्र्यांनाही पराभवाचा फटका बसला. राज्यात काँग्रेसने 14 जागा जिंकत नंबर एकचा पक्ष होण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत भाजपने 28 उमेदवार दिले होते. फक्त 9 उमेदवार विजयी झाले. भारतीय जनता पार्टीच्या या खराब कामगिरीवर पक्षनेतृत्वाने नाराजी व्यक्त केली.
राज्यातील नेत्यांना कठोर शब्दांत फटकारले. भाजपाचं चुकलं कुठं याची माहिती श्रेष्ठींनी घेतली. तसेच महाराष्ट्रात कोणा एकाच्या मर्जीने पक्ष चालणार नाही, कोअर कमिटीला सोबत घ्या अशा स्पष्ट सूचना या बैठकीत देण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा. जुन्या नेत्यांना सोबत घ्या. इच्छुक उमेदवारांना आतापासूनच तयारी करायला सांगा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीत होऊ देऊ नका, असेही दिल्लीतील वरिष्ठांनी या बैठकीत सांगितले होते.
आजच्या स्वार्थी जगात आपली मैत्री; रक्षा खडसेंनी मंत्रिपदाची शपथ घेताच प्रितम मुंडेंची भावनिक पोस्ट
राज्यातील भाजपाच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व प्रचंड नाराज आहे. त्यामुळे भाजपात लवकरच बदल होऊ शकतात. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करून भाजपला सोडचिठ्ठी देणार एकनाथ खडसे लवकरच पक्षात सक्रिय होऊ शकतात. त्यांना पुन्हा सन्मानाने पक्षात घेऊन मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. या राजकारणाची तयारी भाजपने आधीपासूनच सुरू केली आहे. रावेरमधून तिसऱ्यांदा खासदारकी मिळवणाऱ्या रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रिपद दिलं आहे. त्यानंतर आता खडसेंना मोठी जबाबदारी देण्याच्या हालचाली पक्ष नेतृत्वाने सुरू केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर वरिष्ठ नेते कमालीचे नाराज आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ खडसेंना पक्षात पुन्हा सक्रिय करून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. राज्य मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळू शकतं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृह खात्याचा कारभारही खडसेंच्या हाती दिला जाऊ शकतो. जर त्यांना गृहखातं दिलं गेलं नाही तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली जाईल. सध्या चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असून त्यांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सन 2016 मध्ये खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. यानंतर त्यांना पक्षातून एकदमच दुर्लक्षित करण्यात आलं. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी 2020 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीनेही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. पुढे लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदारसंघात महायुतीने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली त्यावेळी राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारीबाबत विचारणा केली होती. मात्र प्रकृतीचे कारण पुढे करत नाथाभाऊंनी नकार दिला होता. यानंतर एप्रिल महिन्यात त्यांनी आपण पंधरा दिवसात भाजपात परतू असे सांगितले होते. मात्र त्यांचा पक्ष प्रवेश रखडला. आता लोकसभा निवडणुकीत पक्षाची वाताहत झालेली पाहता एकनाथ खडसेंना लवकरच मोठी जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त होत आहे.