Chhagan Bhujbal Comment on Nashik Lok Sabha Constituency : सध्या महायुतीत नाशिक मतदारसंघ अत्यंत कळीचा ठरला आहे. शिंदे गटाचा खासदार असताना या मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. या मतदारसंघात छगन भुजबळांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच शिंदे गटातील नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा (Chhagan Bhujbal) एकदा या मतदारसंघाबाबत मोठे विधान केले आहे.
कमळ चिन्हावर मी लढणार ही बातमी चुकीची आणि निराधार आहे. अजितदादांनी नाशिकची जागा मागून घेतली. त्यावेळी वरून (दिल्ली) सांगण्यात आले की ही जागा तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या पण येथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मला सांगितले, असे खळबळजनक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले.
छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ पुढे म्हणाले, माझ्याकडे चिन्हाबाबत कुणी मागणी केली नाही. कुणाशीही माझी चर्चा झाली नाही. यामागे नेमकं काय आहे याचा निर्णय महायुतीचे नेतेच घेतील. नाशिकमध्ये निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढा असा प्रस्ताव दिल्लीतून आल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
Chhagan Bhujbal : नाशिकमधून लोकसभा लढणार का? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
मी कमळ चिन्हावर वगैरे निवडणूक लढणार या बातम्या अतिशय चुकीच्या आणि निराधार आहेत. यांना कसलाही आधार नाही. कमळाच्या चिन्हावर लढा अशी मला कोणतीही ऑफर नाही. परंतु, असे असले तरी नाशिकची जागा अजित पवार गटच लढणार असून तिकीटही मलाच मिळेल असा दावा छगन भुजबळ यांनी केला. नाशिक मतदारसंघात जागावाटपावरून जो तिढा निर्माण झाला आहे तो कधीपर्यंत सुटेल यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, महायुतीचे नेते एकत्रित बसून काय तो निर्णय घेतील. नाशिकमधील निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे या गोष्टींना अजून बराच वेळ आहे.
दरम्यान, राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक मतदारसंघाचे नाव आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी असा दावा शिंदे गटाने केला आहे. भाजपनेही या जागेसाठी जोर लावला आहे. परंतु, आता छगन भुजबळ यांचं नाव पुढे येत असल्याने भाजपने दावेदारी सोडून दिल्याचं सांगितलं जात आहे.