Nana Patekar on Farmer : ‘ज्यावेळी एका शेतकऱ्याच्या घरात जातो त्यावेळी दुःखाची व्याख्याच बदलून जाते. मला त्याचं हे दुःखच माहिती नव्हतं. नटसम्राट आज जर मला करायला सांगितला तर मी वेगळ्या पद्धतीनं करेन. माझ्या नटसम्राटाचं जे दुःख आहे ते चार भिंतीतलं आहे. गोंजारलेलं दुःख आहे. पण, आम्ही आमचं सगळं आयुष्यच आभाळाखाली ठेवलं आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते. पण त्याचा जो एक रास्त भाव आहे तो तरी द्या ना. या पलीकडे आम्ही मागतो तरी काय? आता सरकारकडं मागू नका तर सरकार कुठलं करायचं हे ठरवा’, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शेतकऱ्यांचं दुःख मांडलं आणि शेतकरी वर्गाला पुढील रोडमॅपही दिला. निमित्त होतं नाशिक येथील शेतकरी साहित्य संमेलनाचं.
या संमेलनात नाना पाटेकर यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, आमची आई सांगायची त्यावेळी सोन्याचा भाव सोळा रुपये तोळा होता. आज सोन्याचे काय भाव आहेत मला माहिती नाही. पण तांदळाचा, गव्हाचा भाव त्या पटीत वाढला का? असा सवाल उपस्थित केला. सरकारकडं मागू नका, सरकार कुठलं करायचं हे ठरवा.
Nana Patekar : ‘नटाचं दुःख अन् सिनेमा……’, नाना पाटेकर यांचा खुलासा, व्यक्त केली खंत
रोज आम्हाला अन्न देणारा आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर मग आम्ही तुमची पत्रास का ठेवायची? शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही. तो कितीही चिडला, काहीही झालं. मी आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी शेतकरीच होणार अशा पद्धतीने जगणारी ही जात आहे. पुढचा जन्म कोणता हवा असं जर त्याला विचारलं तर मला शेतकऱ्याचा जन्म नको असं शेतकरी कधीच म्हणणार नाही. जनावरांची भाषा आम्हाला कळते तुम्हाला आमची भाषा कधी कळणार, असाही सवाल पाटेकर यांनी केला.
राजकारणात गेलो तर..
मला राजकारणात जाता येत नाही कारण, माझ्या जे पोटात आहे तेच ओठांवर येतं. दुसऱ्याच दिवशी मला त्या पक्षातून काढून टाकतील. महिनाभराने सगळे पक्ष संपलेले असतील कशाला जायचं तिथं अशा शब्दांत नाना पाटेकर यांनी राजकारणाबाबतही भाष्य केलं.
Nana Patekar: ‘ओले आले’ सिनेमाच्या नावाबद्दल नाना पाटेकरांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…