Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळांचे खूप लाड केले. आता त्यांचे आणखी किती लाड करायचे असा सवाल राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला. जो जे वांच्छिल ते लाभो. त्यांना कुठे जायचं तिकडे जाऊ द्यात असेही कोकाटे यांनी सांगितले. कोकाटे यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, मंत्रिपदात डावलले गेल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भुजबळ भाजपात प्रवेश करणार का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. यातच अजित पवार गटाचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याने राजकारणात नवी चर्चा घडवून आणली आहे.
पवार अन् ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला कधीही..नाराज असलेले छगन भुजबळ असं का म्हणाले?
कोकोटे पुढे म्हणाले, भुजबळ आपण नाराज असल्याचे म्हणत असतील तरी मला तसं वाटत नाही. पक्षाने त्यांचे खूप लाड केले आहेत. आता अजून किती लाड करायचे? त्यांना जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ द्या. माझे नेते अजित पवार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. दुसरे कुणीही आमचे नेते नाहीत असेही कोकाटे यांनी सांगितले.
दरम्यान, कोकाटेंनी याआधीही छगन भुजबळांवर टीका केली होती. भुजबळांना ओबीसी म्हणून फक्त त्यांचा मुलगा आणि त्यांचा पुतण्या इतकेच दिसत असेल. दुसरे कुणी ओबीसी दिसत नसतील तर त्याला काय करणार? चूक असेल तर समजूत काढणार ना. चूकच नसेल तर समजूत कशाची काढणार? भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही यात पक्षाची काहीच चूक झालेली नाही असे माणिकराव कोकाटे याआधी म्हणाले होते.
पत्रकारांनी कोकाटे यांना विचारले होते की, भुजबळ यांनी राज्यसभेवर जावे असे तुम्हाला वाटते का? असा सवाल केला असता कोकाटे म्हणाले, त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावे. मला काय वाटते, याला काही अर्थ नाही. मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, पण मला जे वाटते ते देशात, जगात होईलच असं नाही असेही माणिकराव कोकाटे म्हणाले होते.