अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे गेल्या काही दिवसांपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सत्तेतील काही नेत्यांनीही जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. जरांगेंच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी अनेक शहरात साखळी उपोषणं सुरू आहेत. अहमदनगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही (Ahmednagar Tehsil Office) सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या उपोषणकर्त्यांची प्रकृती आता खालावली आहे.
Disqualification Mla : विधीमंडळात सुनावणी सुरु; शिंदे गटाच्या नेत्यांची दांडी, तर वकिलांचा गोंधळ…
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. राज्याच्या विविध भागात साखळी उपोषणं केली जात आहे. नगर शहरातील तहसील कार्यालयासमोरही मराठा आरक्षणासाठी अन्न त्याग करून आंदोलक उपोषणाला बसले आहेत. गोरख दळवी, संतोष आजबे, नवनाथ काळे,अमोल हुंबे हे चार मराठा कार्यकर्त्यांनी अन्न व जल त्याग उपोषण सुरु केले आहे. दोन दिवसांपूर्वी या उपोषणकर्त्याना तपासण्यासाठी शासकीय आरोग्य पथक उपोषण स्थळी आले होते. मात्र उपोषणकर्त्यांनी उपचार नाकारल्याने हे पथक निघून गेले. मात्र आता चौथ्या दिवशी या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची शुगर लेवल कमी झाल्याने आणि रक्तदाब वाढला आहे.
एका उपोषणकर्त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सरकारने आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून होत आहे.
दरम्यान, मराठा समाजातील काही डॉक्टरांनी या चार तरुणांवर उपचार सुरू केले आहेत. या उपोषणकर्त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, म्हणून सध्या तात्पुरते या चार उपोषण कर्त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. मात्र यातील एका उपोषणकर्त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जर आणखीन दोन दिवस हे आमरण उपोषण सुरू राहिल्यास या उपोषणकर्त्यांची परिस्थिती गंभीर होऊ शकते, असेही उपचार करणारे डॉ. अविनाश मोरे, डॉ. सचिन पांडुळे, डॉ.सुनील बोठे यांनी यावेळी सांगितलं.
सरकारने मराठा आरक्षणाबाबत कोणताही तोडगा काढला नसल्याने आता हे आंदोलन नेमके कुठे थांबणार, अशी चर्चा सुरू आहे. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषणावर आम्ही ठाम राहणार असल्याचे आमरण उपोषणाला बसलेले गोरख दळवी, संतोष आजबे, नवनाथ काळे, अमोल हुंबे यांनी सांगितलं.