Narhari Zirwal : मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा खुलासा आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी केला आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून झिरवळ शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यावर बोलताना नरहरी झिरवळांना भाषणाच्या सुरुवातीलाच आपली भूमिका स्पष्ट केलीयं. विशेष म्हणजे सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच झिरवळांनी हा खुलासा केला. नाशिकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात’; CM शिंदेंचा घणाघात
झिरवळ म्हणाले, मला ना घरका ना घाट का असं करण्याचा प्रयत्न काही मंडळींचा सुरु आहे. मी तसा राजकारणात आहे तसं काही नाही. कैलासवासी हरीभाऊ महाले, सीताराम भोईर असतील, झेडएम कानोळे साहेब असतील, कधी हरिशचंद्र साहेबांच्या सोबत किंवा विरोधात असेल, असं करत-करत मी इथपर्यंत आलो आहे. आता मी येताना, मला काय वाटलं होतं, प्रोटोकॉलप्रमाणे यादी असेल, पंतप्रधान आहेत. आपण आपल्या माणसाचा आदर सन्मान आपणच करायचा असतो, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.
संशयकल्लोळ थांबवा अन् गोडसेंना निवडून द्या; छगन भुजबळांची नाशिककरांना साद
नेमका खुलासा काय?
मी परवा एका धार्मिक कार्यक्रमाला गेलो. वेळो थोडासा मागेपुढे झाला. त्यांची समोरच्यांची प्रचारसभा होती हे मला माहिती नव्हतं. दहा-बारा दिवस अगोदरच अक्षय तृतीयाची पूजा म्हणून मला बोलावलेलं होतं. मला बऱ्याचवेळा असं वाटतं की, पूजेला गेलं तर धार्मिक पूजा म्हणजे पूजा करायची, प्रसाद घ्यायचं आणि निघायचं. पण मी तसा नाही. मी महाप्रसाद घेतल्याशिवाय निघत नाही. मी गेलो, त्यांची सभा शेवटात होती”, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.
मी मंडपाच्या बाहेर उभा राहिलो. आता शेट्टे साहेबांसारखे माझे गुरुवर्य, पण ते त्या बाजूला आहेत आणि मी या बाजूला आहे. म्हणून ते हसायचे. ते म्हणायचे की, या मंडपात. म्हणजे शेट्टे साहेब बोलले नाहीत. पण कार्यकर्ते बोलत होते. मी सांगितलं तुमचं आटोपून द्या. मी पूजेला आलोय. त्यांनी पूजेच्या मंडपातच सभा घेऊन टाकली. आम्ही जवळ आल्यानंतर लगेच फोटो काढला. त्यानंतर दिवसभर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह सगळ्यांचे फोनवर फोन. तुझं असं झालं काय? मी त्यांना सांगितलं की, आपल्या उमेदवार भारतीताई त्यांना वेळ नाहीय. कारण मी एकदा उमेदवारी करुन पाहिलेली आहे. मी तेव्हा हरलोय. पण उमेदवार काय असतो हे मी अनुभवलेलं असल्याचं झिरवळ म्हणाले आहेत.
दरम्यान, नरहरी झिरवळ यांच्याबाबत नुकतंच वेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. विरोधी पक्षांच्या प्रचारसभेत नरहरी झिरवळ दिसल्याने ते शरद पवार यांच्यासोबत जातील, अशा चर्चा सुरु होत्या. अखेर नरहरी झिरवळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सविस्तर याबाबतचा खुलासा केला.