Sudhakar Badgujar Joins BJP : शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर आज नाशिकमधील दिग्गज सुधाकर बडगुजर यांनी (Sudhakar Badgujar) आज भाजपात प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बडगुजर यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. बडगुजर यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर नयना घोलप यांनीही भाजपात प्रवेश केला. प्रवेश होताच बडगुजर यांनी उद्धव ठाकरेंना ललकारलं. ‘मी निष्पाप होतो तरीही माझ्यावर चुकीचे आरोप झाले. माझ्यावर कारवाई झाली. आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल’, अशा शब्दांत सुधाकर बडगुजर यांनी उद्धव ठाकरेंना ललकारलं.
बडगुजर पुढे म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात मी खूप काम केलं. पण नियतीनं अचानक घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध पानी का पानी होईल. राज्यात जो पहिला प्रकल्प सांडपाण्यातून वीज निर्मितीचा केला तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मुख्यमंत्री एक दूरदृष्टीचे नेते आहेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार; मात्र..शरद पवार यांचे मनपा निवडणुकांबद्दल मोठं विधान
दरम्यान, भाजपात प्रवेश करण्यासआधी सुधाकर बडगुजर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला काही स्थानिक नेत्यांचा विरोध होता. ठाकरेंच्या पक्षात असताना भाजपने त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. त्यामुळे बडगुजर यांचा प्रवेश होईल का असा प्रश्न विचारला होता. परंतु, पडद्यामागे सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. त्यानुसार आजच्याच दिवशी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं.
पक्षप्रवेशावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही मनोगत व्यक्त केलं. जुने सगळे वाद मनभेद विसरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या निवडणुकीत जळगाव, नगर, धुळे पालिका आपल्याला ताब्यात घ्यायच्या आहेत. जास्तीत जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवरही भाजपाचा झेंडा फडकावयचा आहे या दृष्टीने काम सुरू करा, असेही महाजन यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत दिलेला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मी पहाटे निघालो तेव्हा मला असं वाटत होतं की साधारण दोन ते तीन दिवसांनी पक्षप्रवेश होईल. पण आज मंगळवार चांगला दिवस असल्याने पक्षप्रवेश आजच निश्चित झाला. त्यामुळे आम्हाला येथे येण्यास उशीर झाला. मोठा स्टेज तयार करुन पक्षप्रवेशाची माझी इच्छा होती. पण आता जाऊ द्या. फक्त विकासासाठीच भाजपात प्रवेश होत असतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात कधीही कुणाचा अनादर केला जात नाही, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बडगुजरांची राजकीय ताकद फायद्याचीच, टोकाच्या विरोधानंतरही फडणवीसांचा ‘Go Ahead’