बडगुजरांची राजकीय ताकद फायद्याचीच, टोकाच्या विरोधानंतरही फडणवीसांचा ‘Go Ahead’

Sudhakar Badgujar in BJP : शिवसेना (उबाठा) चे नाशिकमधील हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. एकीकडे त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिक महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कॅसिनोसोबतच्या व्हायरल फोटोचा बडगुजरांवर बोजा; बावनकुळेंना ‘तो’ संशय, भाजप प्रवेश लटकला
भाजपनं २०१७ मध्ये नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवली होती, मात्र आगामी निवडणुकीत विजयासाठी पक्षाने स्थानिक पातळीवरील प्रभावी, सक्षम आणि राजकारणात मजबूत पकड असलेल्या नेत्यांची गरज ओळखली. याच पार्श्वभूमीवर, बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणण्यात येत आहे, असं म्हणता येईल. बडगुजर हे नाशिकच्या राजकारणात दबदबा असलेले, स्थानिक गटांतटांवर प्रभाव असलेले नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मोठा फायदा होईल, असा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास आहे
स्थानिक पातळीवर तीव्र विरोध
बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकमधील भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. अनेक वर्षे निवडणुकीत विरोधात लढणाऱ्या बडगुजर यांना पक्षात घेणे म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणे आहे, अशी प्रतिक्रिया येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सुरुवातीला “माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नाही” असे सांगत संभ्रम निर्माण केला होता.
भाजप आमदार सीमा हिरे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. “बडगुजर यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असून आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. तसेच, त्यांच्याविरुद्ध १७ गुन्हे दाखल आहेत. अंडरवर्ल्डशीही त्यांचा संबंध असून त्यांच्या मुलावरही गुन्हे दाखल आहेत. हे सर्व लपवण्यासाठीच ते भाजपमध्ये येत आहेत”, अशी टीका त्यांनी केली आहे. तरीही, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थातच देवेंद्र फडणवीसांनी अंतिम निर्णय घेत स्थानिक विरोध झुगारून बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचं ठरवल्याची माहिती आहे.
शिवसेना आजही खंबीर अन् अभेद्यच; ज्यांना जायचं ते गेले, राऊतं बडगुजरांवर काय बोलले?
भाजपने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक असंतोष झुगारून, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांना पक्षात घेण्याचं ठरवलंय. या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून येत असली, तरी पक्षाच्या निवडणूकीतील रणनीतीसाठी हा एक मोठा डाव ठरू शकतो. मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयात हजारो समर्थकांसह बडगुजर प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत ठाकरे गटातील माजी नगरसेवक, काँग्रेसमधील काही पदाधिकारी आणि इतर स्थानिक नेतेही भाजपमध्ये दाखल होतील. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.