Parner News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्यात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून चर्चा झाली. पारनेर-नगरच्या जागेवर शिवसेनेने दावा सांगितला असून यासंदर्भात डॉ. श्रीकांत पठारे यांनी ठाकरेंची भेट घेत मतदारसंघावर दावा ठोकला आहे. यामुळे आता राष्ट्रवादीकडून उमेदवारीच्या तयारीत असलेल्या राणी लंके यांची उमेदवारीच अडचणीत आल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख व विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार श्रीकांत पठारे यांना तातडीने मुंबईला बोलवण्यात आले होते. नगर तालुक्यात भेटीगाठी दौरा चालू असतानाच तिथून तातडीने डॉ.श्रीकांत पठारे मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. या बैठकीला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, खासदार अरविंद सावंत, आमदार मिलिंद नार्वेकर, अहिल्यानगरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे, पारनेर तालुक्यातील गटप्रमुख संतोष येवले, संतोष साबळे उपस्थित होते.
अजितदादांनी लंकेंना पक्कं घेरलं; पारनेरातील बड्या नेत्यांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
मातोश्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीबाबत डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मोठ्या सहकार्याने महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) विजयी झाले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या शब्दानुसार पारनेर-नगर मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडावी असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. तसेच खासदार निलेश लंके हे पारनेर तालुक्यातील आहेत व तेही जुने शिवसैनिक आहेत, त्यामुळे खासदार राष्ट्रवादीचे असल्याने विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असा आग्रह सर्व शिवसैनिकांचा आहे.
याबाबत सर्व अहवाल सादर केला असून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना याची माहिती दिलेली आहे. तसेच शिवसेनेच्या सर्वच वरीष्ठ नेत्यांनी याबाबत सकारात्मक भुमिका मांडली असून आपल्याकडून मतदारसंघात केलेल्या उपक्रमांचा आढावा व चालू असलेल्या प्रचाराचा आढावा गावनिहाय व बूथनिहाय या बैठकीत आपण मांडला असल्याचे डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे.
शिवसेना (उबाठा) निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार असून कोणत्याही परिस्थितीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगत विधानसभा निवडणुकीला शिवसेना सज्ज असल्याचे अधोरेखित केले आहे. श्रीकांत पठारे यांच्या या वक्तव्यानंतर आता पारनेर मतदारसंघातून महाविकास आघाडी कुणाला तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आता लोकचं ठरवतील कुणाला निवडून द्यायचं.. पारनेरसाठी पठारेंनी वाढवला दबाव