अजितदादांनी लंकेंना पक्कं घेरलं; पारनेरातील बड्या नेत्यांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

अजितदादांनी लंकेंना पक्कं घेरलं; पारनेरातील बड्या नेत्यांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ

Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. या घडामोडींचं केंद्र पारनेर ठरत आहे. लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचं राजकारण अजितदादांना धक्का देणारं ठरलं होतं. अजित पवारांच्या गटातील निलेश लंकेंना पक्षात घेत थेट खासदार करण्याची किमया शरद पवारांनी साधली. अर्थात यात मतदारांचा वाटा मोठा राहिला. आता याच पराभवाची परतफेड करण्याचा इरादा अजितदादांनी पक्का केलाय. याची पहिली चुणूक पक्षातील इनकमिंगच्या माध्यमातून दिसली. पारनेरमधील विविध पक्षांतील नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

माजी नगराध्यक्ष विजय औटी, शिवाजीराव गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरची ही पहिली आणि महाविकास आघाडी त्यातही खासदार निलेश लंके यांना धक्का देेणारी घडामोड ठरली आहे.

पारनेरमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही तसेच महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार अद्याप निश्चित नाही. मात्र आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील या जागेवर दावा केला जात आहे. या अनुषंगाने वरिष्ठांकडे मागणी देखील केली जात आहे. ठाकरे गटाकडून डॉ. श्रीकांत पठारे इच्छुक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला शह देण्यासाठी आता महायुतीने देखील कंबर कसली आहे.

Parner Assembly : पारनेरची जागा ठाकरेंना जाणार? शिवसैनिकाने लंकेना आठवण करून दिला लोकसभेतील शब्द

पारनेर विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी बांधकाम सभापती काशिनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, धनगर समाजाचे नेते शिवाजीराव गुजर यांनी त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या रणनितीच्या माध्यमातून खासदार निलेश लंके यांना घेरण्याचा प्लॅन तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

विविध गटातील नेत्यांची अजितदादांनी बांधली मोट

राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले नेते वेगवेगळ्या गटांतून एकत्र आले आहेत. विजय औटी आणि सुजीत झावरे यांचा सुजय विखेंना पाठिंबा होता. तर माधवराव लामखडे यांनी निलेश लंकेंना पाठिंबा होता. लामखडे यांनी साथ सोडणे हे लंकेंना धक्का आहे. पारनेर मतदारसंघातील नगर तालुक्यात त्यांचे चांगले वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते ठाकरे गटातून भाजपमध्ये गेले होते. आता त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. या प्रवेशांमुळे पारनेर तालुक्यातील राजकीय चित्र बदलणार हे मात्र नक्की.

पारनेरमध्ये सध्या चित्र काय ?

पारनेरची जागा आघाडीमध्ये सध्या तरी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे. या ठिकाणाहून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके उमेदवारीसाठी इच्छुक आहे. तर पारनेर हा शिवसेनेचे बालेकिल्ला असून लोकसभेची परतफेड म्ह्णून हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सोडण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे तसेच संदेश कार्ले इच्छुक आहेत. मात्र लंके समर्थकांकडून राणी लंके यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.

आता लोकचं ठरवतील कुणाला निवडून द्यायचं, पारनेरसाठी पठारेंनी वाढवला दबाव

महायुतीत या जागेचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटेल अशी शक्यता आहे.  त्यामुळेच या नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून सुजित झावरे यांच्यासह विजय औटी देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. जर हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळाला तर या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहण्यास मिळू शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube