सुजयच्या वक्तव्याने साई भक्तांच्या भावना दुखावल्या, पण त्यांचा हेतू…; राधाकृष्ण विखे काय म्हणाले?

सुजय विखेंच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. त्यांच्या बोलण्याने भावना दुखावल्या गेल्या हे मान्य. पण, भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता.

Radhakrishna Vikhe

Radhakrishna Vikhe

Radhakrishna Vikhe : साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांहून अधिक लोकांना मोफत अन्नदान करत आहे. त्यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली. महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत जमा झाले, असं विधान माजी खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) केलं. त्यांच्या या वक्तव्याचा आध्यात्मिक क्षेत्रातील काहींनी निषेध केला. त्यावर आता मंत्री राधाकृष्ण विखेंनी (Radhakrishna Vikhe) भाष्य केलं.

‘महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत जमा झाले, संस्थानकडून दिले जाणारे मोफत जेवण बंद करा’, सुजय विखेंचे मोठे वक्तव्य 

सुजय विखे यांच्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. त्यांचा हेतू भिक्षेकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, सुजय विखे यांच्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. त्यांचा हेतू भिक्षेकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता. मात्र मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर बनला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखे यांनी जो शब्द वापरला त्यामुळं भावना दुखावल्या असाव्यात, हे मी मान्य करतो. मात्र त्यांचा हेतू भावना दुखावण्याचा नव्हता, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

सुजय विखे नेमकं काय म्हणाले?
सुजय विखे म्हणाले, शिर्डी संस्थानतर्फे मोफत भोजन दिले जाते. अख्खा देश इथे येऊन मोफत जेवण करतो. त्यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली, महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झाले, शिर्डीच्या प्रसादालयात साईबाबा संस्थानकडून भक्तांना दिले जाणारे मोफत जेवण बंद करावे. शिर्डीला येणाऱ्यांना 25 रुपये देऊन जेवण करणं परवडणारे आहे. त्यानुसार शुल्क आकारण्याचा निर्णय घ्यावा. हा पैसा शिक्षणावर खर्च करा. या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, असं विखे म्हणाले.

सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध…
दरम्यान, शिवसेना (शिंदे गट) धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सुजय विखे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले, येथे शिक्षणाबाबत काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच मदत करतील. भाविकांना मोफत प्रसाद वाटपाला विरोध करणे आणि त्यांना भिकारी म्हणणे हे दुर्दैवी आहे.

 

Exit mobile version