OBC Reservation Meetings In Mumbai : पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजासाठी महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या आदेशामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी नेत्यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार आहे. तर 9 सप्टेंबर रोजी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली शासनस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे.
नागपूरमध्ये 4 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ( OBC Reservation) साखळी उपोषणाची सांगता झाली होती. त्या वेळी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांवर सरकार स्तरावर बैठक होईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता 9 सप्टेंबरला संध्याकाळी 4.30 वाजता मुंबईत (Mumbai) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारच्या आदेशाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूरात झालेल्या बैठकीनंतर 8 सप्टेंबर रोजी मुंबईत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची बैठक घेण्याचे (Sharad Pawar) ठरले. त्यामुळे आज ऑडिटोरियममध्ये ओबीसी नेते एकत्र येऊन सरकारच्या आदेशाबाबत भूमिका स्पष्ट करणार आहेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मात्र सरकारच्या आदेशामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट केलं आहे. तरीसुद्धा इतर नेत्यांमध्ये शंका कायम आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील भोगलवाडी येथे रविवारी झालेल्या मोठ्या सभेत लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) राज्यव्यापी संघर्ष यात्रेचे संकेत दिले. ओबीसी काय आहे? हे आम्ही महाराष्ट्र आणि देशाला दाखवून देणार. दोन दिवसांत ओबीसी संघर्ष यात्रेची घोषणा करू, असे त्यांनी भाषणात सांगितले.
हाके यांनी शरद पवारांवर तीव्र टीका करताना म्हटलं की, तुम्ही काढलेली मंडल यात्रा आम्ही दोन दिवसांत थांबवली. आमच्या नादाला लागू नका. मुंडे साहेब असते तर महाराष्ट्राला ही परिस्थिती पाहावी लागली नसती. पवार साहेब, तुम्ही सगळी पदं घरात ठेवलीत. आमच्याकडे स्वाभिमान गोपीनाथ मुंडेंनी शिकवला. त्यांनी आपल्या भाषणात नाना पाटील, भगवान बाबा, तसेच पोहरादेवी, भगवानगड आणि माळेगावच्या खंडोबाचे उदाहरण देत समाजाला संघटित होण्याचं आवाहन केलं.
लक्ष्मण हाके यांनी बीड येथील सभेत उपस्थित प्रचंड गर्दी दाखवत म्हणाले की, महाराष्ट्र पाहत आहे. मुलं पाच किलोमीटर पायी चालत आली आहेत. हे आमचं सामर्थ्य आहे. ओबीसी नेते मौन बाळगतात, कारण तेच या स्थितीस जबाबदार आहेत. सोळंके यांना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. फडणवीस आम्ही तुमच्याकडे बघून मतदान दिलं, इतरांकडे नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
मुंबईत दोन दिवसांत होणाऱ्या बैठकींमुळे ओबीसी समाजाच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे. सरकारच्या आदेशाबाबत शंका कायम असतानाच, लक्ष्मण हाकेंनी दिलेल्या संघर्ष यात्रेच्या इशाऱ्यामुळे आगामी दिवसांत राज्याच्या राजकारणात नवे समीकरणं दिसू शकतात.