Santosh Deshmukh Case : देशमुख खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात मोठा राजकीच आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. भाजप आमदार सुरेश धस हे पक्षातील आणि महायुतीतील नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. (Deshmukh ) त्यावर राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भूमिका स्पष्ट केली असून पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज देण्याची मागणी केली आहे. शिवाय त्यांनी धस-मुंडे भेटीबद्दलही भाष्य केलं आहे. त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यामध्ये त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, सुरेश धस हे सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात मग त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली? सुरेश धस यांनी या भेटीविषयी महाराष्ट्राला उत्तर देणं अपेक्षित आहे. मागच्या तीन वर्षांपासून राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते तर सुरेश धस हे आमदार होते. त्यावेळी वाल्मिक कराड काम करत होता. मग तेव्हा धसांनी त्याच्याविषयीची तक्रार तिन्ही नेत्यांकडे का केली नाही? मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसू लागलं आहे.
‘माझा आणि माझ्या पक्षाचा बीडच्या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शब्द दिलेला असताना सुरेश धस यांनी हे प्रकरण एवढे का पेटवलं? मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही त्यांनी माझ्यावर थेट आरोप केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी त्यांना समज द्यावी. अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणाचा पहिल्या टप्प्यातील तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र कोर्टात दाखल झाले आहे. या प्रकरणाची पहिली सुनावणी आज (बुधवारी) होणार आहे. बीडच्या केज कोर्टामध्ये ही सुनावणी होईल. या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये आणखी काही लोकांचा आरोपी म्हणून समावेश होऊ शकतो, अशी शक्यता आहे.