Download App

‘तिच्या’ उपचारासाठी एकही ठिकाण नाही; महादेवी हत्तीणीबाबत PETA’इंडियाचा वेगळा सूर

माधुरी हत्तीणीसाठी सोशल मीडियावर पेटा इंडियाने वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

  • Written By: Last Updated:

Mahadevi Elephant  In Maharashtra : ‘महादेवी हत्तीणी’ च्या घरवापसीबाबत (Maharashtra) मुंबईत बैठका सुरू असताना पेटाने लेटर बॉम्ब टाकून महादेवीच्या आरोग्याबाबत पुन्हा प्रश्न निर्माण केला आहे. सोशल मीडियावर पेटा इंडियाने महादेवी वनतारा किंवा इतर हत्ती संवर्धन केंद्रात ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

त्याचबरोबर महादेवीला पुन्हा साखळदंडाने बांधलेलं योग्य नाही असेही त्यांनी नमूद केलं आहे. यामुळे महादेवीचा नांदणी प्रवास पुन्हा लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवीच्या घरवापसासाठी पाठपुरावा सुरू ठेवला असतानाच काल गुरुवार (ता. ७) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘महादेवी’ पुन्हा नांदणीला परतावी, यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.

तसंच, मुंबई येथे वनताराचे वकील, नांदणी मठाचे वकील आणि राज्य सरकारचे वकील यांच्यात बैठक होत आहे. काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असताना पेटाच्या लेटर बॉम्बने पुन्हा खळबळ माजण्याची शक्यता आहे. पेटा इंडिया ने महादेवी हत्तीणीच्या (माधुरी) बाबतीत माहिती देत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माधुरी हत्तीणीच्या पुन्हा नांदणी येथी मठात पाठवण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. परंतु, माधुरीसाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा आहे.

माधुरीची घरवापसी होणार! अंबानींचा यू-टर्न

पेटा इंडियाने १६ जुलै २०२५ रोजी आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास पाठिंबा दर्शवला आहे. या आदेशात माधुरीच्या आरोग्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मानवाप्रमाणेच हत्तींसाठी देखील रुग्णसेवा, विशेष उपचार व निवृत्ती आवश्यक असल्याचे पेटाने स्पष्ट केले आहे. माधुरीला ग्रेड-४ अर्थरायटिस, वेदनादायक फूट रॉट (पायांची विकृती), आणि डोके हलवण्यासारखे मानसिक त्रासाचे लक्षण असणारे वर्तन दिसून येत आहे.

ही सर्व लक्षणे तीव्र मानसिक त्रासाचे निदर्शक आहेत. गेली ३३ वर्षे ती एकाकी, साखळदंडात आणि काँक्रीटच्या जमिनीवर राहिली असून, त्यामुळे तिच्या वेदनांमध्ये भर पडली आहे. न्यायालयाने तिला चांगले वैद्यकीय उपचार, साखळींपासून मुक्तता आणि इतर हत्तींच्या संगतीत जगण्याचा हक्क दिला आहे. या निवेदनात हेही नमूद करण्यात आले आहे की मानसिक त्रासामुळे हत्ती कधीकधी आक्रमक होतात आणि माधुरीनेही स्वामीजींचा म्हणजे भट्टारकांचा जीव घेतला होता. यामुळे माधुरीसाठी शांत, मोकळा परिसर, पाण्याचे स्त्रोत, तज्ञ डॉक्टरांची सेवा आणि इतर हत्तींची संगत मिळणे अत्यावश्यक आहे.

सध्या महाराष्ट्रात अशा प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. मात्र वनतारा (गुजरातमधील केंद्र) ही सुविधा हे सर्व काही देते. जर महाराष्ट्रातही वनताराच्या दर्जाची सुविधा निर्माण झाली, तर तिथे माधुरीला ठेवण्यास ते तयार आहेत. उत्तर प्रदेशातील “Wildlife SOS” किंवा कर्नाटकमधील “Wildlife Rescue and Rehabilitation Centre” मध्ये जर तिला योग्य निवृत्ती जीवन मिळाले, तर तिथे पाठवण्यालाही त्यांचा विरोध नाही. पेटा इंडियाचा एकमेव उद्देश असा आहे की माधुरीला हक्काचं, शांत, सुरक्षित आणि तिच्या शारीरिक व मानसिक पुनर्वसनासाठी योग्य ठिकाण मिळावं. सर्वोच्च न्यायालयानेही हे सुनिश्चित केले होते आणि जर हा मुद्दा पुन्हा उचलला गेला, तर पुन्हा योग्य निर्णय होईल, असा विश्वास पेटाने व्यक्त केला आहे.

follow us

संबंधित बातम्या