पुणे : एकीकडे ओरिजनल पवार आणि बाहेरचे पवार हा वाद सुरू असतानाच आता शरद पवारांची (Sharad Pawar) सून असणाऱ्या सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) खासदार करून दिल्लीत नेण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली असून, येथे सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या मतदार संघाकडे लागल्या आहेत. याच सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीच्या अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या जाहीर सभेचे पुण्यात नियोजन करण्यात आले आहे. येत्या 29 एप्रिल रोजी ही सभा स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. (PM Narendra Modi Rally In Pune)
शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना, बाहेरचे पवार आणि ओरिजनल पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून पवारांवर जोरदार टीका करण्यात आली होती. तर, अजितदादांनी इंदापूरमध्ये वकिल आणि डॉक्टरांना संबोधित करताना ‘तुम्ही सून म्हणून आला असला तरी, आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात असे प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता खुद्द मोदी सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी प्रचार करणार आहेत. मोदींच्या प्रचार सभेनंतर सुनेत्रा पवारांच्या डोक्यावर मतदार विजयाचा मुकुट ठेवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सासुचे चार दिवस संपलेत आता सुनेचे येऊ द्या ना; अजितदादा बेंबीच्या देठापासूनच ओरडले
पुणे, शिरूर, बारामती आणि मावळच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा घेतली जाणार आहे. एस.पी. महाविद्यायाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता ही सभा पार पडणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी पुन्हा पुण्यात येणार आहेत.
सभेसाठी जोरदार तयारी सुरू
मोदींची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होईल, असे प्रदेश भाजपकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार सभेच्या तयारीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार असल्याचे भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.
मी तसं बोललो नव्हतो;, शरद पवारांचे मूळ पवार बाहेरचे पवार वक्तव्यावर स्पष्टीकरण
विरोधकांच्या टिकेला मोदी देणार प्रत्त्युत्तर
सध्या लोकसभेसाठी राज्यासह देशातील विविध भागात प्रचारसभांचे आयोजन केले जात असून, विरोधकांकडून मात्र, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पक्ष फोडण्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. या सर्व टीकेला मोदी पुण्यातील सभेतून काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.