साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाची ठिणगी; जिल्हा परिषद निकालानंतर राजकारण तापलं

या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसमद्धये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे.

Untitled Design 66

Untitled Design 66

Politics heated up after Zilla Parishad results : सातारा जिल्हा परिषदेत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून स्थापनेनंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. भाजपकडे केवळ 28 सदस्यांचे संख्याबळ असताना देखील राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आखलेल्या अचूक राजकीय रणनीतीमुळे भाजपला अतिरिक्त पाठिंबा मिळाला. अखेरीस 33 सदस्यांचा पाठिंबा मिळवत भाजपने साता काबीज केली. या निकालानंतर प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली, तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. मात्र, या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट)आणि राष्ट्रवादी काँग्रेसमद्धये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून महायुतीतच वादाची ठिणगी पडली आहे. या घडामोडींचे पडसाद आता थेट राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेवटच्या क्षणी राजकीय खेळी

निवडणुकीपूर्वी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा केला जात होता. मात्र शेवटच्या क्षणी भाजपने राजकीय डावपेच रचत काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या कथित पळवापळवीमुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निकालाला राजकीय रंग

नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचं आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असल्याने या निकालाला अधिक राजकीय रंग चढला आहे. एका बाजूला भाजपचा विजय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नाराजी, अशा परिस्थितीत साताऱ्यातील राजकारण चांगलच तापलं आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ स्थानिक पातळीपुरता न राहता राज्याच्या सत्ताकेंद्रात पोहोचण्याची चिन्हे आहेत.

Video : मंत्र्याचं बोट रक्तानं माखलं, भाजप–सेनेच फाटलं; साताऱ्यात राजेंनी काय केलं?

कॅबिनेट बैठकीत वादाची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या मंगळवारी होणाऱ्या राज्य कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तवणुकीबाबत नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बैठक केवळ नियमित कामकाजापुरती मर्यादित न राहता राजकीय वादांनी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीमागची इनसाईड स्टोरी

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती एकत्र लढेल अशी अपेक्षा असतानाच भाजपकडून चर्चेची जबाबदारी जयकुमार गोरे यांच्याववर सोपवण्यात आली होती. शिवसेनेकडून मंत्री शंभूराज देसाई तर राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील यांच्याकडे चर्चेची धुरा होती. मात्र जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमुळे या नेत्यांमधील संबंध फारसे सुरळीत नसल्याचे सांगितले जाते. भाजपने चर्चेची जबाबदारी इतर कोणाकडे द्यावी, अशी शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांची भूमिका होती. मात्र भाजपकडून कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे देसाई आणि पाटील यांनी वेगळी भूमिका घेत जिल्ह्यात भाजपला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला.

शेवटच्या क्षणी गेम फिरला

दुसरीकडे देसाई आणि पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना सोबत घेत बहुमत एकवटल्याचा दावा केला. मात्र भाजपकडून काही सदस्यांशी गुप्त संपर्क सुरू असल्याची चर्चा होती. निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सध्या वेशातील पोलिसांमुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यातील फरक ओळखणे कठीण झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद इमारतीत एका उमेदवारावरून झालेल्या झटापटीत शंभूराज देसाई यांच्या हाताला किरकोळ दुखावतात झाली. या गोंधळातच संबंधित उमेदवाराला आपल्या बाजूला वळवण्यात भाजपला यश आल्याची चर्चा आहे. परिणामी भाजपच्या पाठिंब्याने उभ्या असलेल्या प्रिया शिंदे यांचा विजय निश्चित झाला.

साताऱ्यातील राजकारण तापणार?

या संपूर्ण प्रकारामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महायुतीतील मंत्र्यांमध्येच या निवडणुकीवरून टोकाचे मतभेद उफाळून आल्याने येत्या काळात साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मात्र सर्वांचे लक्ष राज्याच्या कॅबिनेट बैठकीकडे लागले असून त्या बैठकीत नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, यावर पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

Exit mobile version