IAS Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या (Pooja Khedkar) अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता केंद्र सरकारची एन्ट्री झाली आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत जर पूजा खेडकर दोषी आढळून आल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असताना आता पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.
परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर सातत्याने चर्चेत आहे. त्यांना ट्रेनिंग पूर्ण होण्याआधीच वाशिमला बदली करण्यात आली. पुण्यात असताना पूजा खेडकर यानी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन आणि स्टाफची मागणी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी नियुक्तीच्या वेळी जी कागजपत्रे सादर केली होती त्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, आई-वडिलांवर गुन्हा दाखल
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी अपंगत्व प्रमाणपत्रच नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे (ईडब्ल्यूएस) प्रमाणपत्रही जोडले आहे. याबरोबरच त्यांनी क्रिमिलेयर किंवा नॉन क्रिमिलेयरमधून अप्लाय करण्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच दरम्यान पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पूजाने क्रिमिलेयर की नॉन क्रिमिलेयरमधून अर्ज केला होता का असा प्रश्न विचारला असता दिलीप खेडकर म्हणाले, याबाबत कमिटी नियु्क्त करण्यात आली आहे. कमिटीसमोर आम्ही म्हणणे मांडू. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे यावर काही बोलणे योग्य होणार नाही. नियमानुसारच आम्ही कार्यवाही केली आहे.
या प्रकरणात पत्रकार परिषद घ्यायची किंवा नाही याबाबत आम्ही वकिलांशी चर्चा करत आहोत. माझ्या मुलीला विनाकारण त्रास दिला जात आहे. एका महिलेने बसण्यासाठी जागा मागितली तर त्यात काहीचं चुकीचं नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासलं तर खरं काय ते समोर येईल. यामागे कुणीतरी नक्कीच आहे जो हे सगळं जाणूनबुजन करत आहे असे दिलीप खेडकर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले.
दिल्लीत फिरली तपासाची चक्रे, दोषी आढळल्या तर थेट नारळ; पूजा खेडकर प्रकरण नव्या वळणावर
पूजा खेडकर दिल्ली एम्समध्ये तपासणीसाठी हजर का राहिल्या नाहीत असा प्रश्न विचारला असता दिलीप खेडकर म्हणाले, हे अर्धसत्य आहे. युपीएससी परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे. या परीक्षेवर अजून कुणीच शंका घेतलेली नाही. तिथे 20-25 लोकांचे बोर्ड असते. रुग्णालयात तपासणी केली जाते. कुणी कागद दिला सबमिट केला आणि सिलेक्शन झाले अशी प्रक्रिया नसते. आम्ही नोटिफिकेशनला आव्हान दिले होते त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही.