Prajakt Tanpure Join BJP : अहिल्यानगरची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या या जागेवर आता भाजपकडून दावा करण्यात येत आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. भाजपकडून या जागेसाठी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाली आहे.
राहुरी पोटनिवडणुकीत माघार घेतल्यानंतर माजी आमदार तनपुरे (Prajakt Tanpure) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. तर आता तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या जागेसाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असून यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकारणात जोराने सुरु झाली आहे. राहुरी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या आवाहनानंतर तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. तर आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून अहिल्यानगरची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची उमेदवारी त्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असल्याने त्यांनी स्वत:चे फेसबुक प्रोफाईल बदलले असून आता डीपीमध्ये त्यांनी जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर नगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.
सुनील तटकरे भडकले, भाषणापूर्वीच पार्थ पवारांनी बैठक सोडली? राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?
माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात गेले, तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले मात्र दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दु:ख होते असं राहुरी पोटनिवडणुकी दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले होते.
