Download App

मुंडेंच्या कुस्ती स्पर्धेत ढाकणेंचा नवा डाव…बावनकुळेंसोबत एकाच मंचावर, राजळेंचे टेन्शन वाढले

Chandrashekhar Bawankule : राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय उलथापालथ होऊ लागल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule : राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय उलथापालथ होऊ लागल्या आहेत. यातच अनेक राजकीय मंडळींची पाऊले हे सध्या सत्ताधारी पक्षाकडे वळू लागली आहे. या दरम्यान नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढलेले राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे (Pratap Dhakane) व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे एकाच मंचावर उपस्थित होते. यामुळे ढाकणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रताप ढाकणे यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. एकीकडे भाजप पदाधिकाऱ्याच्या या कार्यक्रमाला भाजपचे नेते मंडळी उपस्थित होते. मात्र स्थानिक आमदार मोनिका राजळे मात्र गैरहजर होत्या.

यातच विधानसभेला राजळे यांच्या उमेदवारीला आव्हान दिल्याने मुंडे व राजळे यांच्यामधील मतभेद या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पक्षविरोधी तसेच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्याने बावनकुळे यांनी या कार्यक्रमाला येऊ नये अशी मागणी काही राजळे समर्थकांनी बावनकुळे यांच्याकडे केली होती अशी चर्चा आहे. मात्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह काही महायुतीच्या आमदारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यामुळे राजळे यांचे कार्यकर्ते देखील नाराज होते. मात्र यामध्ये भर म्हणजे या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना देखील निमार्ण देण्यात आले होते. यामुळे ढाकणे यांच्या भाजप प्रवेशाच्या अन् त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार मोनिका राजळे नाराज झाल्याच्या चर्चांना तोंड फुटलं आहे व बावनकुळे व ढाकणे हे एकाच मंचावर असल्याने ढाकणे हे भाजपकडे वाटचाल करणार का अशी चर्चा रंगली आहे.

मुंडे व राजळे यांच्यामधील नाराजीनाट्य

विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोनिका राजळे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी अरुण मुंडे यांनी केली होती. तसेच राजळे यांच्या प्रचारापासून मुंडे यांनी स्वतःला बाजूला ठेवले होते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजळे यांनी केली होती असे देखील बोलले जाते. यामुळे एकच पक्षात असलेले अरुण मुंडे व आमदार मोनिका राजळे यांच्यामध्ये एकमेकांविरोधात नाराजी होती. यातच भाजपच्या वरिष्ठांनी या कार्यक्रमाला येऊ नये अशी विनंती राजळे समर्थकांनी केली होती. मात्र वरिष्ठांची हजेरी आणि मुंडे यांनी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी राजळे यांचे विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रताप ढाकणे यांना निमंत्रित केले. यामुळे राजळे समर्थक नाराज झाल्याची चर्चा आहे.

राजळेंचे नाव टाळले

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार राजळे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर टाकण्यात आले नव्हते. एकीकडे विरोधी पक्षातील ढाकणे यांना निमंत्रण देण्यात आले. तसेच त्यांना मान्यवरांसोबत बसवण्यात आले होते. यामुळे राजळे समर्थकांनी स्पर्धेकडे पाठ फिरवली. मात्र या कार्यक्रमाला राज्यपातळीवरील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह ढाकणे यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे ढाकणे यांचा भाजप प्रवेश होणार का? व असे झालेच तर राजळे यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

15 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार; जाणून घ्या नवीन बदल

follow us