Vanchit Bahujan Aghadi on Sharad Pawar : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Pawar) यांनी आज विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले होते, ते मला 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते असा दावा केला. दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यात वातावरण तापलं आहे, वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत शरद पवार यांना काही प्रश्न विचारले आहेत.
विधानसभेच्या 160 जागा जिंकून देतो, त्या दोन माणसांची गॅरंटी.. शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!
नेमकं काय म्हटलं?
शरद पवार जी तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात! दोन लोकं तुम्हाला भेटली, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर दिली आणि सांगितले की, ते तुम्हाला १६० विधानसभेच्या जागा जिंकून देतील. तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला त्यांची नावे माहित नाहीत. तर ही गोष्ट सांगा…
१. तुम्ही पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडं तक्रार का केली नाही? तुम्ही या दोघांविरुद्ध तक्रार केली नाही पण, तुम्ही त्यांना राहुल गांधींकडं निवडणूक हेराफेरीचा सौदा करण्यासाठी घेऊन गेलात.
२. जर तुम्हाला त्या दोघांची नावं आणि पत्ता माहीत नसेल, तर जेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या घरात प्रवेश हा त्यांची नावे न लिहिताच झाला असेल! त्यांची नावे प्रवेश करतांना नोंदणीतून उघड होऊ शकतात.
३. तुमचे हेतू स्पष्ट नव्हते, म्हणूनच तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलात. तुम्हाला माहित होतं की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी होऊ शकते. मग तुम्ही गप्प का होता? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही इतके दिवस गप्प राहिलात?
४. राहुल गांधींनी तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात याची पुष्टी करावी.
५. राहुल गांधी वरील सर्व प्रश्नांची पुष्टी करतील का? ‘
असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शरद पवार यांना करण्यात आला आहे, दुसरीकडे भाजपने देखील यावरून पवारांवर निशाणा साधला आहे.