“विधानसभेच्या 160 जागा जिंकून देतो, ‘त्या’ दोन माणसांची गॅरंटी..” शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

“विधानसभेच्या 160 जागा जिंकून देतो, ‘त्या’ दोन माणसांची गॅरंटी..” शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

Sharad Pawar : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) सध्या मतचोरीचा मु्द्दा उपस्थित करुन सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) घाम फोडला आहे. यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी पुरावे देखील सादर केले. या घडामोडी घडत असतानाच आता ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईव्हीएमच्या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला.

काय म्हणाले शरद पवार?

मला आठवतंय विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसं मला दिल्लीत भेटायला आले. त्यांची नावं आणि पत्ते आता माझ्याकडे नाहीत. दोघांनी मला सांगितलं की महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंकी नव्हती. असे लोक भेटत असतात मी दुर्लक्ष केलं. हे झाल्यावर त्या लोकांनी आणि राहुल गांधींशी भेट करून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींसमोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधींचं मत झालं. लोकांचा जो काही निर्णय असेल तो आपण स्वीकारू असे आम्ही ठरवल्याचे शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला.

“मतचोरीच्या आरोपावर आयोगाने उत्तर द्यावं, भाजपने नाही”, शरद पवारांची राहुल गांधींना भक्कम साथ

दरम्यान, शरद पवार आणि राहुल गांधी यांची भेट घेणारी ती दोन माणसं कोण होती याची चर्चा सुरू झाली आहे. या दोन माणसांनी नेमकी काय ऑफर दिली होती, ही माणसं कोण होती त्यांचा निवडणूक प्रक्रियेशी काही संबंध होता का असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. शरद पवार यांच्या या वक्तव्याला आमदार आव्हाड यांनी दुजोरा दिला आहे. दोन व्यक्ती शरद पवारांकडे आल्या होत्या हे उभ्या जगासमोर आणि भारताला सांगितलं आहे. मतदार याद्यांत धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पवारांपर्यंत पोहोचली होती असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

आयोगाने राहुल गांधींना उत्तर द्यावे

राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलाय. आयोगावर त्यांनी आरोप केले आहेत. पण यावर उत्तर देण्यासाठी भाजप किंवा मुख्यमंत्री पुढे येतात. याचं कारण काही मला समजू शकलेलं नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे. भाजपकडून नाही. राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगानेच उत्तर द्यायला हवं. उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडून शपथपत्र मागितलं जात आहे जे अत्यंत चुकीचं आहे असे शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube