Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत. येथे हजारोंच्या संख्येने मराठा बांधवही मुंबईतच आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भाने केलेल्या वक्तव्यावरुन आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. तसंच, शरद पवार हे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना लक्षात आलं नाही का? असा सवालही विखे पाटलांनी उपस्थित केला आहे.
जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींसमोर ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्यावरच आम्ही चर्चा करतोय. शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना का लक्षात आलं नाही? मराठा समाजासोबत का अंतर्भाव केला? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणाची मागणी आजची नाही ना, त्यांच्याकडे जबाबदारी असताना त्यांनी ती निभवली नाही, अशा नेत्याने बोलणं हे दुर्दैवी आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी आरक्षण आंदोलनावरुन शरद पवारांवर टीका केली आहे.
माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि उपसमितीमधील अधिकारी काल मनोज जरांगे यांना भेटले. शासनाकडून जी कार्यवाही करतोय त्याची कल्पना त्यांना दिली, त्यांच्याही मुद्द्यांसदर्भात चर्चा झाली. यावेळी, काही मंत्री ऑनलाइन होते. हैदराबाद आणि सातारा गॅझिटेअयरची अंमलबाजावणी झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही ह्या गोष्टी तपासून घेतोय. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्यासोबत बैठक आहे. आज संध्याकाळी त्यांच्यासोबत चर्चा होईल. कायदेशीर गुंता झालाय, त्यासाठी काही पर्याय आहे का हे बोलून मार्ग काढला जाईल, असंही विखे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरच आम्ही काम करतोय. मग अंतिम प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडं घेऊन जाऊ, लगेच जाणं योग्य नाही, नंतर ते म्हणतील मी मुद्दे दिले आहेत. कोणत्याही आंदोलनाचा त्रास शहरातील लोकांना होतच असतो. मात्र, त्यांच्या मागण्या पण मुंबईकरांनी समजून घेतल्या पाहिजे. जनतेला कोणता त्रास होणार नाही, याची दक्षता आंदोलक घेतील असं वाटतं. जनतेला त्रास होईल असं करू नका, आवाहनाला साद लोकांनी दिली आहे. काही लोकं बदनाम करण्यासाठी आंदोलनाला आले असतील तर समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील. जरांगे पाटील देखील तसंच सांगत आहेत असंही विखे पाटील म्हणाले.