राहुरी पोटनिवडणूक अटीतटीची; कर्डिले, विखे की तनपुरे कोण मारणार बाजी? नवीन अहवालाने वाढली इच्छुकांची धाकधूक

Rahuri By-Election :  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात

Rahuri By Election

Rahuri By Election

Rahuri By-Election :  अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आले असून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून संधी कुणाला मिळणार याबाबत केवळ राहुरी मतदारसंघातच नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपकडून शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि माजी खासदार सुजय विखे पाटील हे प्रमुख दावेदार मानले जात आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री आणि आमदार  प्राजक्त तनपुरे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत कोण? बाजी मारणार सध्या याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. तर आता राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स’ या संस्थेने थेट ग्राउंडवर जाऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.

सहानुभूती विरुद्ध राजकीय अनुभव

रुद्र रिसर्च अँड एनालिटिक्स या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणुकीसाठी (Rahuri By-Election) भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले, माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या नावाची नागरिकांमध्ये चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या नावाची चर्चा होताना दिसतेय. मात्र, अलीकडच्या काळामध्ये माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची केलेली स्तुती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा ग्राउंडवर नागरिकांमध्ये होत आहे. तसेच भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट केले असले तरी मतदारांमध्ये मात्र त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा दिसून येते.

भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्या पाठीशी शिवाजी कर्डिले यांची सहानुभूती असल्याचे दिसून येते. मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव आणि युवा चेहरा अशी अक्षय कर्डिले (वय 30) यांची ओळख असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलने मर्यादित जनसंपर्क आणि मर्यादित राजकीय अनुभव यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे दिसून येते.

जर भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले विरुद्ध महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत झाल्यास, सहानुभूतीचा मुद्दा, माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले यांना पाठिंबा मिळाल्यास अक्षय कर्डिले यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. पण ही निवडणूक राजकीय अनुभवाच्या मुद्द्यावर झाल्यास अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे  प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर महाविकास आघाडीकडे सक्षम उमेदवाराचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचा एकतर्फी किंवा बिनविरोध विजय होण्याची शक्यता आहे.

निवडणूक बिनविरोध?

तर राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिले, सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा असल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.  कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, सत्तेतील पक्ष असल्याचा फायदा, सुजय विखे पाटील यांची ताकद, प्राजक्त तनपुरेंची पक्षाविषयी असलेली संभ्रमाची भूमिका यामुळे राहुरी मतदारसंघात आजच्या घडीला भाजपचे पारडे जड असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

निवडणुकीचे मुद्दे काय?

या अहवालानुसार, दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघातील नागरिकांमध्ये सहानुभूती दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सहानुभूतीचा मुद्दा महत्वाचा ठरणार हे जवळपास स्पष्ट आहे.तसेच शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांची प्रतिस्पर्धी संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय अनुभवासोबत तुलना होत असल्याने हा देखील मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता दिसून येते.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला व दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत असून, याशिवाय, साखर कारखान्यांकडून उसाची बिले वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेले अपघात, वाहतूक कोंडी, धूळ यामुळे नागरिक त्रस्त झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघ

राहुरी विधानसभा मतदारसंघ 3 तालुक्यांमध्ये विभागला गेला आहे. राहुरी तालुक्यातील 1 लाख 93 हजार 683 (58%)  मतदार, अहिल्यानगर तालुक्यातील 82 हजार 240 मतदार (25%) मतदार आणि पाथर्डी तालुक्यातील 57 हजार 29 मतदारांचा (17%) राहुरी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.  एकूण 7 जिल्हा परिषद गटांचा पूर्णपणे समावेश होतो. तसेच राहुरी नगरपालिकेचा समावेश होतो. याशिवाय दरेवाडी नवनागापूर आणि नागरदेवळे या जिल्हा परिषद गटातील काही गावांचा या मतदारसंघात समावेश होतो. या मतदारसंघात एकूण 138 गावांचा समावेश होत असून एकूण 374 बूथ आहेत. राहुरी मतदारसंघातील एकूण मतदान 3 लाख 32 हजार 952 इतके आहे. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 71 हजार 988 इतके तर महिला मतदार 1 लाख 60 हजार 964 इतके आहेत.

बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा पवार बिनविरोध की लक्ष्मण हाके फिरवणार भाकरी? नवीन अहवाल समोर-

Exit mobile version