A senior MNS leader in Mumbai joined the BJP :शिवाजी पार्कवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, या सभेपूर्वीच भाजपने मनसेला मोठा राजकीय धक्का दिल्याचे समोर आले आहे. मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी आपल्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
महत्त्वाचे म्हणजे, निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात उभे असलेले मनोज घरत यांनी यापूर्वीच आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत घरत यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला असून, यामुळे मनसेला डोंबिवलीत मोठा झटका बसल्याची चर्चा आहे.
भोसरीत मुख्यमंत्री फडणवीसांची सभा; स्वागतासाठी उडवलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला भीषण आग
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 22 मध्ये आयोजित भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या जाहीर सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे विभाग अध्यक्ष रविंद्र गरुड, विभाग सचिव केदार चाचे, मनविसे विभाग अध्यक्ष संदीप शिंदे, शाखाध्यक्ष संतोष शिलकर, उपशाखाध्यक्ष निनाद मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शरद गाढवे, मयुर कुऱ्हाडे, अविनाश कटारे, गणेश कुऱ्हाडे, अक्षय हाडवळे, निलेश ठक्कर, अर्जुन भानुशाली, मृणाल साळवी, रतन संसारे, प्रभु लहाणे, अंकुश मेस्त्री, परमेश्वर ताटु, मयुर उतेकर, प्रशांत जुवळे, बाळा कदम, स्वप्निल हाडवळे आदींचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रियाताई जोशी, जुनी डोंबिवली मंडल अध्यक्ष पवन पाटील, भाजपा–महायुतीच्या बिनविरोध उमेदवार ज्योतीताई पवन पाटील तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपा-महायुतीचे उमेदवार राहुल दामले, प्रकाश भोईर, अनमोल म्हात्रे, जनार्दन म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे मनसेच्या गोटात अस्वस्थता वाढली असून, डोंबिवलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
