मुंबई : दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे. मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे, बहिण सत्वशीला जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश जाधव यांनी वेगळी चूल मांडत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. आज (20 जानेवारी) किल्ले रायगडवरुन त्यांनी ‘जय शिवसंग्राम’ संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्यासोबत शिवसंग्राम संघटनेतील महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारीही जय शिवसंग्राम संघटनेत सहभागी झाले आहेत.
विनायक मेटे हयात असेपर्यंत मेटे कुटुंबीय आणि शिवसंग्राम (Shivsangram) संघटना यात सारे काही आलबेल होते. रामहरी मेटे हेही शिवसंग्राम संघटनेचे आघाडीवर राहुन काम करत होते. मेटे मुंबई किंवा राज्याच्या दौऱ्यावर गेल्यानंतर बीडमधील संघटनेचे कामकाज रामहरी मेटेच बघत होते. मात्र मेटेंच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आणि संघटनेतही संघर्षाची ठिणगी पडली. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि मुलगा आशुतोष यांच्याशी रामहरी यांचे पटेनासे झाले.
त्यानंतर आता याच अंतर्गत वादामुळे रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज किल्ले रायगडवरुन त्यांनी ‘जय शिवसंग्राम’ संघटनेची स्थापना केली आहे. यामुळे संघटनेला आणि राजकीय ताकदीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांबाबत रामहरी मेटे यांनी संघटनेची दिशा अद्यापपर्यंत स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ते आता स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार की स्वबळावर हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, रामहरी मेटे यांच्या बंडानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संघर्षाची तयारी दर्शवली आहे. विनायक मेटे यांनी रायगडावर ‘शिवसंग्राम’ची स्थापना केली आहे. त्यांनी राज्यभर निर्माण केलेल्या मावळ्यांच्या साथीने ही संघटना पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु ही संघटना कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला.
येणाऱ्या काळात जरूर संघर्ष करावा लागेल. पण दिवंगत विनायक मेटे यांच्याकडून आम्ही संघर्ष शिकलेलो आहोत. आता पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसंग्राम पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढविणार आहे. मात्र या जागा कोणत्या असाव्यात, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.