Ramrao Vadkute’s wealth figures revealed : भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर रामराव वडकुते यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली असून, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ऍफिडेव्हिटनुसार वडकुते यांची एकूण कौटुंबिक संपत्ती सुमारे 8 कोटी 69 लाख 95 हजार 328 रुपये इतकी आहे. या संपत्तीत जंगम मालमत्ता, शेतीजमिन तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावरील गुंतवणुकीचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांच्या ऍफिडेव्हिटनुसार कोणतेही कर्ज नमूद करण्यात आलेले नाही.
ऍफिडेव्हिटनुसार रामराव वडकुते यांच्या नावावर 1 कोटी 11 लाख 96 हजार 480 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यामध्ये त्यांच्या जवळ 2 लाख 280 रुपये रोख रक्कम असल्याची नोंद आहे. तसेच विविध बँक खात्यांमध्ये 84 लाख 20 हजार 682 रुपयांच्या ठेवी आहेत. वाहनांमध्ये त्यांनी 2020 मॉडेलची टोयोटा इनोव्हा कार असल्याचे नमूद केले असून तिची किंमत सुमारे 19 लाख 50 हजार रुपये दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या नावावर 50 ग्रॅम सोने, ज्याची किंमत सुमारे 6 लाख 40 हजार रुपये, तसेच 200 ग्रॅम चांदी, ज्याची किंमत सुमारे 14 हजार रुपये, अशी नोंद आहे.
वडकुते यांच्या पत्नीच्या नावावरही लक्षणीय जंगम मालमत्ता असल्याचे ऍफिडेव्हिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. बँक ठेवी, गुंतवणूक आणि दागिने यांसह त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 2 कोटी 2 लाख 60 हजार 93 रुपये इतकी असल्याचे कागदपत्रांमधून स्पष्ट झाले आहे. याशिवाय वडकुते यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर शेतीजमीन आहे. ऍफिडेव्हिटनुसार विविध गावांमध्ये मिळून त्यांच्या नावावर सुमारे 5 कोटी 55 लाख 38 हजार 755 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यात पिंपळी गावातील गट क्रमांक 263 मधील जमीन सुमारे 45 लाख 38 हजार 755 रुपयांची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
राज्यसभेवर आठवलेंची हॅटट्रिक! किती आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची संपत्ती?
त्याच गावातील गट क्रमांक 264 मधील जमीन तब्बल 3 कोटी रुपयांची असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच गट क्रमांक 260 मधील जमीन 50 लाख रुपयांची आहे. याशिवाय ताडकळस गावातील गट क्रमांक 71 मधील जमीन सुमारे 40 लाख रुपयांची आहे. तसेच वांरगाव गट क्रमांक 218, वारला गट क्रमांक 57 आणि कारेगाव गट क्रमांक 68 या ठिकाणीही प्रत्येकी सुमारे 40 लाख रुपयांची शेतीजमीन असल्याचे ऍफिडेव्हिटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या सर्व जमिनींची एकत्रित किंमत 5 कोटी 55 लाखांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.
चल आणि अचल मालमत्तेचा एकत्रित विचार केला असता रामराव वडकुते यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 8 कोटी 69 लाख 95 हजार 328 रुपये, म्हणजेच साधारण 8.70 कोटी रुपये इतकी असल्याचे स्पष्ट होते. यामध्ये स्वतःची जंगम मालमत्ता 1.11 कोटी रुपये, पत्नीची जंगम मालमत्ता 2.2 कोटी रुपये आणि शेतीजमिनींच्या स्वरूपातील स्थावर मालमत्ता 5.55 कोटी रुपये इतकी आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या ऍफिडेव्हिटमध्ये कोणतेही कर्ज किंवा देणी नसल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर असलेली सर्व संपत्ती कर्जमुक्त असल्याचे कागदपत्रांमधून दिसून येते. दरम्यान, भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर रामराव वडकुते यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांची राजकीय कारकीर्द नव्या टप्प्यावर पोहोचली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक झाल्याने सध्या राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे.
