Rohit Pawar reveals new details in Ajit Pawar’s plane crash case : अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विशेषतः व्ही. के. सिंह यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या वेळी दृश्यमानता केवळ सुमारे 3000 फूट होती. सामान्यतः 5000 फुटांपेक्षा कमी दृश्यमानता असताना विमान उड्डाण करण्यास कॅप्टन टाळतात.
मात्र अशा परिस्थितीतही व्ही. के. सिंग यांनी कॅप्टन कपूर यांना विमान उडवण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या निर्देशांमुळेच अपघात घडला का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात कॅप्टन कपूर यांच्या रक्त तपासणीत दारू किंवा ड्रग्जचे कोणतेही अंश आढळले नसल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे अपघातासाठी पायलट जबाबदार नसून इतर घटकांचा तपास करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सीआयडीकडून तपास व्हावा, तसेच व्ही. के. सिंग यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) चीही तपासणी केली जावी, अशी मागणी केली आहे. रोहित पवार यांनी असा आरोपही केला की, या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. व्ही. के. सिंग यांनी तपास यंत्रणांसमोर काही नावे उघड केल्यास अनेक मोठ्या व्यक्तींना अडचणी येऊ शकतात, त्यामुळेच त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
Video : एका थेंबाने सडेल व्यक्तीचं शरीर… इराणमध्ये पडणारा काळा पाऊस नेमका काय?
याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रफुल्ल पटेल यांनाही थेट प्रश्न विचारले. रोहित पवार म्हणाले की, VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग यांच्या राजस्थानमध्ये झालेल्या विवाह सोहळ्याला प्रफुल्ल पटेल उपस्थित होते का? जर ते गेले असतील, तर त्या लग्नाला इतर कोणते नेते उपस्थित होते आणि ते कोणत्या पक्षाचे होते, याची माहिती महाराष्ट्रासमोर मांडावी. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. याबाबत तुम्ही पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडाल, अशी अपेक्षा आहे, असे आवाहन देखील रोहित पवार यांनी केले.
रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे VSR कंपनीचे मालक आणि त्यांचा मुलगा रोहित सिंग यांच्या विवाह सोहळ्यात नेमके कोणते राजकीय नेते उपस्थित होते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. काही मोठे नेते त्या लग्नाला उपस्थित असताना व्ही. के. सिंग यांना का वाचवले जात आहे, असा सवाल करत रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. दरम्यान, या प्रकरणात अपघात होता की घातपात, याबाबतही आता विविध प्रश्न उपस्थित होत असून सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी पुढे आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
