पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार येत्या दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमधून आणि 28 तालुक्यांमधून ही यात्रा निघणार आहे. एकूण 22 मुद्द्यांवर आधारे ही यात्रा असणार आहे. दसऱ्याला (24 ऑक्टोबर) पुण्यातील भिडे वाडा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने यात्रेची सुरुवात होणार असून नागपूरमध्ये पवार यांच्याच सभेने यात्रेची सांगताही होणार आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. (Rohit Pawar’s Yuva Sangharsh Yatra will begin on Dasara with Sharad Pawar’s rally)
रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे ते नागपूर अशी जवळपास 820 किलोमीटरची पायी यात्रा होणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शरद पवार यांच्या सभेने पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून यात्रेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन यात्रा पुढे मार्गस्थ होईल. दररोज किमान 16 ते जास्तीत जास्त 25 किलोमीटर चालण्याचे नियोजन असणार आहे.
45 दिवसांच्या यात्रेत अनेक प्रश्नांना हात घातला जाणार आहे. उद्योग, स्पर्धा परिक्षा, कॉन्ट्रॅक्ट भरती, दत्तक शाळा जीआर असा विविध 22 मुद्दे या यात्रेत असणार आहेत. या शिवाय यात्रेत केवळ शरद पवार यांचाच फोटो वापरला जाणार आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. आज (9 ऑक्टोबर) रोहित पवार यांच्या हस्ते यात्रेची वेबसाईट लॉन्च करण्यात आली. या वेबसाईटवर सर्व माहिती सातत्याने दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, ज्या भागात नवीन एमआयडीसी याव्यात यासाठी प्रयत्न केले जातात तिथेही राजकारण केलं जातं जसं माझ्या मतदारसंघात आज सुरू आहे. या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतील. पण, मागील काही वर्षांपासून प्रोजेक्ट आपल्या राज्यात न राहता अन्य राज्यात चालल्याचे आपण पाहत आहोत. बेरोजगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सरकार धोरणांबद्दल बोलत नाही. आयटी कंपनी मोठ्या शहरांत कशी येईल यासाठी तुम्ही धोरण करता पण अन्य जिल्ह्यांत आयटी आणण्यासाठी वेगळं धोरण करावं लागेल पण यावरही चर्चा केली जात नाही. हे सरकार एसीत बसून, अधिकाऱ्यांशी चर्चा करून धोरण तयार करत आहे, असा आरोप त्यांनी केले.