Sale of loose edible oil has virtually stopped : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध आणि औषधांविरोधातील कारवाईला मोठा वेग आला आहे. या मोहिमेचे पडसाद आता ग्रामीण भागात देखील उमटू लागले असून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यासह अनेक भागांमध्ये किराणा दुकानांमधून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षांपासून ग्राहकांना गरजेनुसार अर्धा लिटर, एक लिटर किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात सुटे तेल विकले जात होते.
मात्र गेल्या महिनाभरात परिस्थितीत अचानक बदल झाला असून आता बहुतांश दुकानदार ग्राहकांना थेट कंपनी पॅक असलेल्या खाद्यतेलाच्या पिशव्या किंवा डबेच विकत आहेत. भेसळविरोधी कारवाईच्या धास्तीमुळे सुट्या तेलाची विक्री कमी झाल्याची चर्चा सुरू आहे. या बदलामुळे ग्राहकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काहींना तेलाच्या चवीत आणि गुणवत्तेत फरक जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पूर्वी विकले जाणारे सुटे तेल नेमके कोणत्या प्रकारचे होते आणि त्यामध्ये भेसळ तर नव्हती ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
108 दिवसांच्या भीषण संघर्षानंतर अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; 19 जूनला जिनिव्हात होणार स्वाक्षऱ्या
अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार भेसळयुक्त खाद्यतेलामध्ये पामतेल, ऑर्गेमोन तेल, खनिज तेल, वापरलेले तेल तसेच कृत्रिम सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो. अशा तेलाचे दीर्घकाळ सेवन केल्यास हृदयविकार, रक्तदाबाच्या समस्या, रक्ताची घनता वाढणे, त्वचारोग, अपचन तसेच हृदयविकाराच्या झटक्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे हॉटेल्स, फास्ट फूड केंद्रे, लग्नसमारंभ आणि मोठ्या भोजन कार्यक्रमांमध्ये अशा तेलाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे यापूर्वीच्या तापसांमधून समोर आले आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्या कामाचे कौतूक करत सरकारला इशारा दिला आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तुकाराम मुंढे चांगले काम करत असून त्यांच्या बदलीचा विचार करू नये, अन्यथा सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे जरांगे यांनी म्हटले आहे. राज्यभर सुरू असलेल्या या भेसळविरोधी मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढत असून आपण आजवर वापरत असलेल्या अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आता अधिक सजगपणे प्रश्न विचारले जात आहेत. तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून ग्रामीण भागातील खाद्यतेल विक्रीच्या पद्धतीतही मोठा बदल होताना दिसत आहे.
