Samadhan Saravankar makes serious allegations against BJP leaders : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रभादेवी परिसरातील प्रभाग क्रमांक 194 मधून उभे असलेले माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मित्रपक्षांतील अंतर्गत नाराजी आणि आरोपांची मालिका सुरू झाली आहे. या प्रभागातून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी विजय मिळवला. समाधान सरवणकर यांना 14,191 मते मिळाली, तर निशिकांत शिंदे यांनी 15,235 मते मिळवत अवघ्या 582 मतांनी ही लढत जिंकली.
पराभवानंतर समाधान सरवणकरांची नाराजी
निकालानंतर समाधान सरवणकर यांनी थेट भाजपच्या स्थानिक नेत्यांवर बोट ठेवलं. भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. “काही भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना मला मदत करू नका, सरवणकर कुटुंबासाठी काम करू नका, असे व्हॉट्सॲप संदेश पाठवले. सुरुवातीला साथ होती, पण शेवटच्या टप्प्यात मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आलं,” असा दावा समाधान सरवणकरांनी केला. भाजपमधील एका गटामुळेच आपला पराभव झाला, असा आरोप करत त्यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मोठी बातमी! राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष- चिन्हाची सुनावणी लांबणीवर
महेश सावंत यांची घणाघाती टीका
समाधान सरवणकरांच्या आरोपांनंतर ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
“2017 मध्ये बालहट्ट पुरवण्यासाठी सरवणकरांनी आपल्या मुलाला नगरसेवक बनवलं. आज पराभवाचं दुःख आहे की निवडणुकीत वाटलेल्या पैशांची परतफेड होणार नाही, हे दुःख आहे?” असा उपरोधिक सवाल सावंत यांनी उपस्थित केला. इतकंच नव्हे तर त्यांनी सरवणकर कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रवासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “कधीकाळी एका घरात तीन कुटुंबं राहत होती, आज हजारो स्क्वेअर फूटात राहतात. ही प्रगती कुणामुळे झाली? एका मिल कामगाराला ओळख आणि मान कुणामुळे मिळाला?” असा सवाल करत त्यांनी थेट हल्ला चढवला.
भाजपला मोठा धक्का, कल्याण -डोंबिवली महापालिकेत शिवसेना – मनसेचा महापौर
‘पैशाला जनता भुलली नाही’
महेश सावंत यांनी निवडणुकीतील कथित खर्चावरही आरोप केले. “यावेळी प्रचंड पैसा वाटण्यात आला, जेवणं, पिकनिक, कार्यक्रम आयोजित केले गेले. पण प्रभादेवी-दादरची स्वाभिमानी जनता या सगळ्याला बळी पडली नाही,” असं ते म्हणाले.
भाजपच्या दाव्यांवरही टोला
भाजपकडून ‘आम्ही इथून जिंकलो असतो’ असा दावा केला जात असताना, सावंत यांनी त्यालाही प्रत्युत्तर दिलं. “मागील निवडणुकीत भाजपची इथं केवळ एकच जागा होती. हा परिसर शिवसेनेचा गड होता आणि तो तसाच राहिला,” असं सांगत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. दरम्यान, “दादर-माहिमकरांना सरवणकर नाव आठवू नये, असं काम मी करून दाखवेन,” असं आव्हानही महेश सावंत यांनी दिलं आहे.
