Praveen Gaikwad on NCP support : संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना आहे. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजात रुजावेत याच भूमिकेतून काम करत आहे. मागील काही काळात आमच्या अनेक विचारवंताच्या हत्या झाल्या. 2014 ते 2019 पर्यंत अनेकांना संरक्षण दिले होते. अशावेळी पुरोगामी विचारांच्या पक्षांच्या मागे संभाजी ब्रिगेड उभा राहात असेल तर त्यात काही चुकीचे नाही. राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा देण्याचे कारण नाही जर राष्ट्रवादी काही चुकीच करत असेल तर त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीला पाठिंबा देणार आहे का? असा प्रश्न लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त केली.
प्रवीण गायकवाड म्हणाले की भाजपने हिंदुत्वाचे राजकारण देशात आणले आहे. 2024 च्या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात तापवला जाणार आहे. गेले काही दिवस हिंदू जनआक्रोश मोर्चे निघाले होते. सावरकर सन्मान यात्रा निघाली होती. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पुरोगामी लोक जनतेचं प्रबोधन करत नाहीत. मागील 75 वर्षात महात्मा गांधींना बदनाम करण्यात आले पण त्यावेळी पुरोगामी म्हणून घेणारे पक्ष बोलले नाहीत, असं प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
गांधींना ज्यांनी बदनाम केलं तेच आता सावरकारांचे समर्थक आहेत. आम्हाला लोकांचे वैचारिक प्रबोधन करावे लागणार आहे. आम्हाला ज्या विचारसरणीचा धोका आहेत, ते लोक सत्तेत असल्याने जास्त धोका आहे. आमच्या अनेक विचारवंताच्या हत्या झाल्या आहेत. 2014 ते 2019 पर्यंत अनेकांना संरक्षण दिले होते. आमचे विचारवंत संरक्षणात राहणार असतील तर त्यांची सत्ता धोकादायक आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड पुरोगामी विचाराच्या पक्षांच्या मागे उभा राहात असेल तर त्यात काही चुकीचे नाही. संभाजी ब्रिगेडने राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा देण्याचे कारण नाही जर राष्ट्रवादी काही चुकीच करत असेल तर त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.