कोल्हापूर : आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. यात संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची स्वराज्य संघटनाही कंबर कसून कामाला लागली आहे. याच तयारीचा भाग म्हणून संभाजीराजेंचे निकटवर्तीय संजय पोवार (Sanjay Powar) यांची स्वराज्य संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली असून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. (Sambhaji Raje Chhatrapati’s close associate Sanjay Powar has been appointed as Kolhapur District Chief of Swarajya Sangathan.)
कोल्हापूर लोकसभेकरिता संभाजीराजे छत्रपती यांचे नाव चर्चेत आहे. एक तर स्वराज्य संघटनेकडून स्वबळावर किंवा स्वराज्य संघटनेकडून आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने ते लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे सांगितले जाते. नुकतेच जिल्ह्यात स्वराज्य संघटनेचा भव्य मेळावा कोल्हापूरमध्ये पार पडला. या मेळाव्यात त्यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता. या संपूर्ण मेळाव्याचे नियोजन देखील संजय पोवार यांनीच केले होते. या पार्श्वभूमीवर संजय पोवार यांची स्वराज्य पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी केलेली नियुक्ती ही संभाजीराजे यांच्या लोकसभा तयारीची नांदीच आहे, असे स्पष्ट दिसून येते.
वातावरण तापले आहे, त्यामुळे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र किती जागा लढवणार, मी कुठून निवडणूक लढवणार याबाबत अद्यापचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र एकच सांगतो, आम्ही जुन्या जखमा अजूनही विसरलेलो नाही” असे आव्हान देत संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वीच 2009 च्या पराभवाचा वचपा काढणार असल्याचे सुतोवाच केले होते. मी त्या प्रसंगाला वार म्हणणार नाही. कारण आमच्यावर कोणीही वार करु शकत नाही. मात्र वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल. स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. उदयसिंह गायकवाड यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथून तब्बल पाचवेळा विजय साकारला. 1999 नंतर सदाशिवराव मंडलिकांमुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीकडे सरकला. पण 2009 मध्ये “आता बैल म्हातारा झाला आहे, नवीन खोंड निवडा.” असं म्हणत शरद पवार यांनी मंडलिकांना डावलून संभाजीराजे छत्रपतींना उमेदवारी दिली.
त्यावेळी युती धर्माचे पालन करत काँग्रेसचे तत्कालिन नेते सतेज पाटील यांनी संभाजीराजे आणि राष्ट्रवादीचे काम केले. मात्र सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष अर्ज भरला आणि निवडून आले. त्यावेळी राष्ट्रवादीतील काहींनी मंडलिकांना छुपी मदत केली होती, असा आरोप झाला. पण त्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाले. 2016 मध्ये केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केले.